“त्या” पर्यटकाच्या मृत्यूप्रकरणी बोट मालकासह कर्मचाऱ्यावर गुन्हा…

436
2

मालवण दांडी येथे घडलेली घटना; मृताच्या पत्नीची पोलीस ठाण्यात फिर्याद…

मालवण, ता. २१ : दांडी समुद्रात पॅरासिलिंगनंतर स्पीड बोटीच्या प्लॅटफॉर्मवरून समुद्रात पडून मृत्यू पावलेल्या अजर मंजर अन्सारी वय-३३ रा. साकीनाका मुंबई या पर्यटकाच्या मृत्यू प्रकरणी पत्नी हिनाबी अन्सारी यांनी आज येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बोटमालक सहदेव बापर्डेकर यांच्यासह अन्य बोट कर्मचार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुर्घटना ५ जानेवारीला घडली होती.
साकीनाका मुंबई येथील इंजिनिअर असलेला अजर अन्सारी हे पत्नी हिनाबी हिच्यासह गोवा-मालवण येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. ५ जानेवारीला ते गोव्यातून ग्रॅड स्कूबा ट्रॅव्हल्सने दांडी येथे वॉटरस्पोर्टस् करण्यास आले होते. पॅरासिलिंग झाल्यानंतर सुरवातीस अजर हे पत्नी हिनाबीसह बोटीत बसले होते. त्यानंतर ते बोटीच्या प्लॅटफॉर्मवर जावून बसले. बोट सुरू झाल्यावर ते अचानक समुद्रात पडला. बोटीवरील माणसांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी अजर यांना समुद्रातून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र उपचारापूर्वीच अजर यांचा मृत्यू झाला. यात अजर यांचा मृत्यू समुद्रात बुडल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
आज याप्रकरणी अजर यांची पत्नी हिनाबी यांनी येथील पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. यात त्यांनी ५ तारखेला पती अजर सोबत वक्रतुंड पॅरासिलिंग बोटीवरून पॅरासिलिंग करण्यास दांडी येथील खोल समुद्रात गेले होते. पॅरासिलिंग करताना त्यांनी आम्हाला लाईफजॅकेट दिले होते. मात्र अन्य पर्यटकांचे पॅरासिलिंग असल्याने ते पुन्हा आमच्याकडून काढून घेण्यात आले. बोटीत आम्हाला बसण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे पती अजर हे प्लॅटफॉर्मवर जावून बसले. यात अचानक बोट सुरू केल्याने ते समुद्रात पडले. आमच्या ही बाब लक्षात आल्यावर आम्ही वाचवा वाचवा अशी ओरड मारली. याच दरम्यान पॅरासिलिंग सुरू होते. त्यामुळे अजर यांना पाण्यातून बाहेर काढण्यात उशिर झाला. त्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वक्रतुंड या पॅरासिलिंग बोटीवर प्रशिक्षित कर्मचारी, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. त्यांच्या या निष्काळजीपणामुळेच आपला पती अजर यांचा मृत्यू झाल्याची फिर्याद हिनाबी यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बोटमालक सहदेव बापर्डेकर यांच्यासह अन्य बोट कर्मचार्‍यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी हे करत आहेत.

4