अजित अभ्यंकर; भारताच्या राज्यघटनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न…
सावंतवाडी ता.२२: देशातील संघपरिवारातील लोक भारताचे राष्ट्रीयत्व धर्माच्या आधारावर बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत,हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करणे,हा त्यांचा यामागचा मुख्य हेतू असुन,त्यांचा हा विचार म्हणजे भारताच्या राज्यघटनेला सुरुंग लावल्यासारखाचं आहे,अशी टीका ज्येष्ठ विचारवंत राजकीय विश्लेषक कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी आज येथे केली.दरम्यान आपण सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र येत एन.आर.सी,एन.आर.पी आणि सी.ए.ए या कायद्याच्या विरोधात दारोदारी जाऊन जनजागृती करूया,आणि अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन पुढे नेऊ या,असे आवाहनही श्री.अभ्यंकर यांनी उपस्थितांना केले.आम्ही भारतीय नागरिक या संघटनेच्या वतीने आज येथील नाथ पै सभागृहात आयोजित जाहीर परिषदेत ते बोलत होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर जेष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो,रमेश बोन्द्रे,मायकल डिसोझा,नगरसेवक बाबू कुडतरकर,जयेंद्र परुळेकर,शुभांगी सुकी,भारती मोरे,ऍड.संदीप निंबाळकर,रफिक मेमन,अल्ताफ खान,महेश परुळेकर,समीर बेग,तौकिर शेख,हिदायतुल्ला खान,अफरोज राजगुरू, ऑगस्तीन फर्नांडिस, अन्वर खान,सत्यवान जाधव,किशोर वरक,अब्दुल साठी,रियाज मलानी,तौकिर शेख,आदी उपस्थित होते.
श्री.अभ्यंकर पुढे म्हणाले,एन.आर.सी कायद्याअंतर्गत प्रत्येक नागरिकाला त्यांचे नागरिकत्व आई-वडिलांच्या पुराव्यासहित सिद्ध करायचे आहे.आणि जे कोणी सिद्ध करू शकत नाहीत,ते स्वतःला भारतीय म्हणू शकत नाहीत अशी ही योजना आखण्यात आली आहे.
सी.ए.ए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत बंगाल अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातून आलेल्या मुस्लिमांना सोडून इतर निर्वासित म्हणून आलेल्यांना या ठिकाणी नागरिकत्व देण्याचा कायदा करण्यात आला आहे.मात्र त्यांना नागरिकत्व देण्यात आमचा विरोध नाही,फक्त मुस्लिमांना त्यामधून का वगळण्यात आलं याचे उत्तम आम्हाला सरकारने द्यावे,असे श्री.अभ्यंकर यांनी यावेळी सांगितले.यावरून भारताचे नागरिकत्व हिंदू धर्मावर अवलंबून आहे,असे दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.असा आरोपही त्यांनी यावेळी केला.