बांद्यात भाजपचाच उपसरपंच बसणार…

386
2
Google search engine
Google search engine

अक्रम खान; शिवसेनेची तूर्तास “वेट अँड वॉच”ची भूमिका….

बांदा.ता,२२: 
सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बांदा सरपंच पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेचा पराभव करत एकहाती विजय मिळविला होता. उद्या गुरुवार दिनांक २३ रोजी उपसरपंच निवडणूक जाहीर झाल्याने पुन्हा याठिकाणी शिवसेना व भाजप मध्ये राजकीय रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायतीत भाजपचे ८ व शिवसेनेचे ६ सदस्य आहेत. एक जागा रिक्त आहे. त्यामुळे भाजपचाच उपसरपंच बसणार असल्याचा विश्वास सरपंच अक्रम खान यांनी व्यक्त केला आहे. भाजपकडून ३ उमेदवार इच्छुक आहेत ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरस्कर यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.
गेल्या अडीच वर्षात शहरातील राजकारणात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. शहरातील भाजपाची एकहाती सत्ता उलथवून टाकण्यासाठी शिवसेना व तत्कालीन महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांनी एकत्रित निवडणूक लढविली होती. १५ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत आघाडीने ११ जागी विजय मिळविला होता. त्यामध्ये शिवसेनेचे ६ तर स्वाभिमानाचे ५ सदस्य व भाजपचे ४ सदस्य निवडून आले होते. नारायण राणे यांनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन केल्याने बांद्यातील सत्ता समीकरण देखील बदलले. ५ सदस्य भाजपवासी झाल्याने भाजपची सदस्य संख्या ९ झाली. या राजकीय घडामोडीत भाजपचे वर्चस्व पुन्हा शहरात प्रस्थापित झाले.
उपसरपंच असलेले अक्रम खान हे थेट सरपंच पदी निवडून गेल्याने उपसरपंच पद हे रिक्त आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने भाजपचे संख्याबळ हे ८ झाले आहे. भाजपकडून प्रभाग एक मधील सदस्य हर्षद कामत, उमांगी मयेकर, प्रभाग दोन मधून निवडून आलेले जावेद खतीब हे इच्छुक आहेत. यापैकी एकाची वर्णी उपसरपंच पदी लागणार आहे. उमांगी मयेकर या यापूर्वी देखील निवडून आल्याने त्या अनुभवी आहेत.
शिवसेनेकडे संख्याबळ कमी असल्याने अद्याप सेनेने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र महिला उमेदवाराला संधी मिळाल्यास सेनेचा पाठिंबा राहणार असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी सांगितले. गुरुवारी दुपारी ३ वाजता ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक होणार आहे. दोन उमेदवारांना समान मते मिळाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा सरपंचांना असतो. आवाजी पद्धतीने मतदान होणार असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी डी. एस. अमृतसागर यांनी दिली.
पक्षीय बलाबल
एकूण सदस्य संख्या- १५
भाजप- ८
शिवसेना- ६
रिक्त जागा- १
सरपंच- भाजप