वेंगुर्ले नगरपरिषदचे कौतुक करावे तेवढे थोडेचं…

166
2

नारायण राणे; स्वच्छता क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप…

वेंगुर्ला ता.२२: नगरपरिषद क वर्ग नगरपरिषद असूनही या नगरपरिषदेने येथे भरवलेला भव्यदिव्य असा हा स्वच्छता क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव पाहता त्यांच्या नियोजनातून दूरदृष्टी आणि एकसंघ पणा दिसून येतो.स्वच्छतेमध्ये सर्वांना आदर्शवत काम करून नावलौकिक मिळवलेल्या या वेंगुर्ले नगरपरिषदचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.या शहराच्या विकासासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील,असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले.दरम्यान यांच्या उपस्थितीत आणि पार्श्वगायिका कविता राम व डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे यांच्या कार्यक्रमाने महोत्सवाच्या शानदार समारोप झाला.
वेंगुर्ले शहराच्या वतीने या समारोप कार्यक्रमात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी खासदार नारायण राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार
केला. तत्पूर्वी नारायण राणे व सौ. नीलम राणे यांनी पार्श्वगायिका कविता राम व डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे यांच्या कार्यक्रमाचा घेतला आस्वाद. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डीचोलकर, माजी नगराध्यक्ष पूजा कर्पे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, नगरसेवक विधाता सावंत, धर्मराज कांबळी, शीतल आंगचेकर, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, कृपा गिरप- मोंडकर, पूनम जाधव, साक्षी पेडणेकर, बाळू देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खास. राणे पुढे म्हणाले की, चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे. नगरपालिकेने स्वच्छतेबरोबरच क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू बनावेत यासाठी विविध क्रीडा स्पर्धा तसेच आपल्या नगरीतील नागरिकांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले. यातून दूरदृष्टी आणि मुख्याधिकारी यांनी सांगितलेल्या आढावा यातील विकास कामांची प्रगती पाहता सर्वात जुनी असलेल्या या नगरपरिषदेला सर्वार्थाने वैभवाकडे जाण्यास वेळ लागणार नाही. राजकारण विसरून सर्व नगरसेवक एक दिलाने काम करतात असे उदाहरण फारच कमी ठिकाणी असते. मात्र हा एकोपा असाच ठेवा नागरिकांचे सहकार्यही तुम्हाला भरभरून मिळेल. महोत्सव हा प्रबोधन करण्यासाठी असतो आणि या महोत्सवातून सर्वांचे नक्कीच प्रबोधन होईल यात शंका नाही. निसर्गसंपन्न असलेला हा वेंगुर्ले तालुका मला खूप आवडतो. या शहराची पर्यटनदृष्ट्या प्रगती करणे अजूनही शक्य आहे. तसा दृष्टिकोन ठेवा आणि प्रामाणिकपणे सर्वांनी मेहनतीने काम करा, वेंगुर्ले शहर राज्यातच नव्हे तर देशात सुंदर आणि वैभवशाली शहर म्हणून ओळखले जाईल असा विश्वास वाटतो असेही खा. राणे यांनी यांनी सांगितले.
दरम्यान नगराध्यक्ष गिरप व मुख्याधिकारी यांनी वेंगुर्ला न.प. च्या विकासकामांचा आढावा आपल्या मनोगतात घेतला. तसेच यावेळी मच्छिमार समाजच्यावतीने खासदार नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला. तर वेंगुर्ला मच्छिमार्केट बांधकाम प्रगतीपथावर असल्याने व यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल मच्छिमार समाजाच्यावतीने नगराध्यक्ष गिरप व मुख्याधिकारी वैभव साबळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला न.प. च्या तेजोमय विकासाची वाटचाल सांगणाऱ्या पुस्तिकेचे अनावरण खा. राणे व मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेत वेंगुर्ला शहराचा इतिहास, मागील ३ वर्षात केलेल्या कामांचा आढावा व नागरिकांचा सोबती म्हणजेच नागरिकांना उद्भवणारे प्रश्न याची विशेष माहिती आहे. यांनातर या महोत्सवा अंतर्गत घेण्यात आलेल्या कबड्डी, व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेते तसेच विविध क्रीडा क्षेत्रातील यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.

4