भारत हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष राहणे गरजेचे…

117
2

किशोर बेडकिहाळ;गोगटे वाळके महाविद्यालयाच्या कार्यक्रमात प्रतिपादन…

बांदा.ता,२३:  भारतीय लोकशाहीला व राष्ट्रवादाला लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य ही परिणामे आहेत. भारतीय राष्ट्रवादाने भारतीय संविधान निर्माण केले. संविधानाने राष्ट्रवाद निर्माण केले नाही. धार्मिक ,वांशिक व संमिश्र राष्ट्रवाद असे तीन राष्ट्रवाद भारतात वसत आहेत. भारत हे राष्ट्र धर्मनिरपेक्षच राहिल हे राष्ट्रवादाचे प्रमाण तत्व आहे, असे प्रतिपादन सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी येथे केले.
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भाषा विभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक म्हणून श्री. बेडकिहाळ बोलत होते.
चर्चासत्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डी. बी. वारंग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी सचिव एस. आर. सावंत, खजिनदार टी. एन. शेटकर, सहसचिव डी. एस. पणशीकर, संचालक सुभाष मोर्ये, प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत, समन्वयक प्रा. डॉ. डी. जी. जोशी, प्रा. डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. शरद शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘राष्ट्र, राष्ट्रवाद आणि साहित्य’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला बीजभाषक म्हणून जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ हे होते.
श्री. बेडकिहाळ पुढे म्हणाले की, साहित्यातील राष्ट्रवाद समग्र जीवनातून आलेला आढळतो. राष्ट्रवाद ही नकारात्मक संकल्पना आहे. मी अन्य कोणत्याही प्रदेशाचा वा भूमीचा नाही म्हणून मी या देशाचा नागरिक आहे. अशी राष्ट्रवादाची संकल्पना आहे. राष्ट्रवादाच्या माध्यमातून साम्राज्यवाद निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री वारंग म्हणाले की, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम आम्ही राबवित आहोत. त्यामध्ये महाराष्ट्रातील थोर विचारवंताना निमंत्रित करून त्यांच्या विचाराचा वसा व वारसा जपला जातोय. एक वैचारिक मेजवानी या निमित्ताने मिळत आहे. प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत यांनी स्वागत केले. प्रास्ताविक समन्वयक डॉ. जोशी यांनी केले. या चर्चासत्राला गोवा, महाराष्ट्र आदी राज्यातील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे चर्चासत्र ८ सत्रात संपन्न झाले असून या सत्रामधून ३० शोधनिबंध सादर करण्यात आले. या चर्चासत्रात एकूण ५६ जणांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन. डी. कार्वेकर यांनी केले. आभार प्रा. एस. बी. शिरोडकर यांनी मानले.

4