विरोधी नगरसेवकांची टीका : नगरपंचायत सत्ताधार्यांचा नाकर्तेपण…
कणकवली, ता.२३: कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी केंद्र सरकारने साडे सात कोटीचा निधी मंजूर केला होता. मात्र नगरपंचायत सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळे हा निधी मागे गेला आहे. खासदार विनायक राऊत यांनी हा निधी आणला होता. तर आमदार वैभव नाईक यांनी भूमिगत वीज वाहिनीचे भूमिपूजन केले होते. शिवसेनेच्या खासदार, आमदारांनी भूमिगत योजना आणल्यामुळे नगरपंचायत सत्ताधार्यांनी या भूमिगत वीज वाहिनीला एनओसी दिली नाही. त्यामुळे या योजनेचा निधी मागे गेला अशी टीका विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर आणि रूपेश नार्वेकर यांनी केली.
येथील विजयभवन येथे नगरपंचायतीमधील शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक, भाजपचे नगरसेवक रूपेश नार्वेकर आणि स्वीकृत नगरसेवक कन्हैया पारकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी योगेश मुंज, शेखर राणे आदी उपस्थित होते.
सुशांत नाईक म्हणाले, केंद्र शासनाच्या एकात्मिक उर्जा विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी भूमिगत वीज वाहिनी मंजूर झाली. यात मालवण शहरातील भूमिगत योजनेचे काम सुरू झाले. मात्र कणकवली शहरातील सत्ताधार्यांनी भूमिगत वीज वाहिनीच्या कामाला एनओसी दिली नाही. ही वीज वाहिनी टाकण्यासाठी रस्ते खुदाई केली जाणार होती. त्यासाठी नगरपंचायतीने 2300 रूपये प्रति चौरस मिटर एवढा प्रचंड दर लावला. तर मालवण नगरपालिकेने 925 रूपये प्रति चौरस मिटर दर निश्चित करून काम सुरू केले. वस्तुतः ही या योजनेसाठी खासदार विनायक राऊत यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे कणकवली नगरपंचायतीचे पदाधिकारी तसेच आमदार नीतेश राणे यांनी कणकवलीत भूमिगत वीज वाहिनी योजना सुरू करू दिली नाही.
कन्हैया पारकर म्हणाले भूमिगत वीज वाहिनीचा ठेका हायटेक कंपनीला निश्चित झाला होता. त्यानंतर या ठेकेदाराने सातत्याने नगरपंचायत मध्ये चक्करा मारल्या. पण नगरपंचायतीमधील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात तडजोड होऊ शकली नाही. त्यामुळे नगरपंचायतीने या योजनेसाठी ना हरकत दाखला दिला नाही. तसेच योजनेची मुदत संपल्याने निधी मागे गेला आहे.
रूपेश नार्वेकर यांनी टक्केवारीच्या राजकारणामुळे ही योजना कार्यान्वित होऊ शकली नसल्याचा आरोप केला.