सिंधुदुर्गनगरीत २५ जानेवारीला एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन…

97
2

बार कौन्सिल;गोव्यासह पाच जिल्हयाचे वकील राहणार उपस्थित…

ओरोस ता.२३: 
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा यांच्यावतीने शनिवारी 25 जानेवारी रोजी एक दिवशीय ‘कायदे विषयक मार्गदर्शन कार्यशाळा’ सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषि भवन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यासाठी कोल्हापुर, सांगली, सातारा, रात्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांसह गोवा राज्यातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. वेळोवेळी कायद्यामध्ये झालेल्या सुधारणा, नवनवीन आलेले कायदे, विविध कायद्यांतर्गत न्यायाधीशांनी दिलेले निकाल याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ही कार्यशाळा विशेषता नवोदित वकील यांच्यासाठी मार्गदर्शनासाठी असून अन्य वकील सुद्धा यात सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशी कार्यशाळा होत असून याचा जिल्ह्यातील सर्व वकिलांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवाचे सदस्य वकील संग्राम देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेवेळी सिंधुदुर्ग बार असोसिएशनचे अध्यक्ष वकील राजेंद्र रावराणे, सचिव वकील अमोल मालवणकर, सहसचिव यतीश खानोलकर, सदस्य नीलिमा गावडे, अमोल सामंत, विवेक मांडकुलकर, हितेश कुडाळकर, अविनाश परब, शार्दुल ठाकुर आदी वकील उपस्थित होते.
या कार्यशाळेला मुंबई उच्य न्यायालयाचे न्यायाधीश सी व्ही भडंग, मुंबई उच्य न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुनील कोतवाल, गोवा राज्याचे अधिष्ठाता देवीदास पांगम, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र- गोवाचे अध्यक्ष अविनाश भिडे, उपाध्यक्ष अमोल सामंत, सतीश देशमुख, सदस्य संग्राम देसाई, रात्नागिरी बार असोसिएशन अध्यक्ष अशोक कदम, सिंधुदुर्ग अध्यक्ष राजेंद्र रावराणे उपस्थित राहणार आहेत, असे यावेळी संग्राम देसाई यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना वकील देसाई यांनी, सकाळी 10 वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष, जेष्ठ सदस्य व विधिज्ञ वकील जयंत जयभावे हे युवा वकिलांना मार्गदर्शन करणार आहेत. बार कौन्सिल सदस्य वकील गजानन चव्हाण हे बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 या कायद्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तर सायंकाळच्या सत्रात बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष सुधाकर आव्हाड हे हिंदू वारसा कायदा 6 व 8 मध्ये मुलींना वारसा हक्क अधिकार याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही कार्यशाळा सुरु राहणार आहे.

15 फेब्रुवारी नाशिक येथे राज्य कार्यशाळा
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा यांची राज्यव्यापी कार्यशाळा 15 व 16 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भारताचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मुंबई उच्य न्यायालयाचे सर्व न्यायाधीश, राज्यातील जेष्ठ वकील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला राज्यातील वकील उपस्थित राहणार आहेत. या राज्यस्तरीय कार्यसशाळेची जनजागृती करण्यासाठी 25 रोजी प्रशिक्षण कायर्शाळा सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले आहे, असे यावेळी वकील देसाई यांनी सांगितले.

4