संजू परबांचा आरोप;पुन्हा निधी मिळावा या मागणीसाठी २६ जानेवारीला उपोषण…
सावंतवाडी ता.२३: शहरातील अंडरग्राउंड वीज वाहिन्यांसाठी आलेला ११ कोटी रुपये निधी वेळेत खर्च न झाल्यामुळे परतून गेला आहे.याला सर्वस्वी वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी जबाबदार आहेत,असा आरोप करत तो निधी तात्काळ परत न मिळाल्यास २६ जानेवारीला सर्व नगरसेवकांसह येथील वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण छेडणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिला.यासंदर्भात उपोषणादरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांचे योग्य ते आश्वासन मिळाल्या शिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही,असेही श्री.परब यांनी यावेळी सांगितले.येथील पालिकेच्या सभागृहात श्री.परब यांनी सर्व नगरसेवकांच्या उपस्थित वीज वितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी विजवीतरणच्या अनागोंदी कारभारा बाबत कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांना जाब विचारण्यात आला.
यावेळी यावेळी ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो,आनंद नेवगी,परीमल नाईक,शुभांगी सुकी,समृद्धी विरनोडकर,सुधीर आडिवरेकर,दीपाली भालेकर,वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अनिल यादव,महेश गोंधळेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरातील सुमारे १५ किलोमीटर अंतरावर अंडरग्राउंड वीज वाहिन्यांसाठी विद्युत मंडळाकडून अकरा कोटी रुपये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले होते.सावंतवाडी शहराबरोबरच वेंगुर्ला,मालवण व कणकवली या शहरालाही ही योजना मंजूर होती.सावंतवाडी शहरातील रस्त्यांचा विचार करता सुरुवातीला रस्ता खोदाईसाठी पालिकेने संबंधित कंपनीला मीटर मागे अडीच हजार रुपये नुकसान भरपाई भरणा करा,असे सांगितले होते.त्यामुळे सुमारे तीन वर्षांपूर्वीचे हे काम रखडले होते.अलीकडे नोव्हेंबरमध्ये प्रभारी नगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये या कामा संदर्भात चर्चा होऊन संबंधित कंपनीला अडीच हजार रुपयाचे नुकसान भरपाई कमी करत ती एक हजारावर ठरविण्यात आली होती.तसा ठरावही संमत करण्यात आला होता.पालिकेने याबाबत वीज वितरण कंपनीला लेखी पत्राद्वारे एक हजार प्रमाणे होणाऱ्या नुकसान भरपाईचे दीड लाख रुपये भरून काम सुरू करा,असे कळवले होते. मात्र कंपनीने हे काम सुरू केले नव्हते.परिणामतः सदरचे ११ कोटी रुपये ३१ डिसेंबर २०२० रोजी वीज वितरण कंपनीच्या मुंबई मुख्य कार्यालयाला परत गेले .याबाबत आज पार पडलेल्या बैठकीत सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रमेश लोकरे यांना धारेवर धरले.व सदरचे पैसे परत का गेले याबाबत खुलासा द्या असे सांगितले.तसेच हे पैसे परत द्या शहर विकासासाठी यासाठी प्रसंगी सर्व नगरसेवकांना घेऊन आंदोलन छेडू,असा इशारा दिला.