नेमळे येथील घटना; कारवार ते गुजरात करत होता प्रवास…
सावंतवाडी ता.२३: कारवार येथून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या गांधीधाम एक्सप्रेस मधून खाली पडल्याने एका परप्रांतीय प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.राजेशभाई बच्चूभाई वाघेला(३५) रा.सुरेंद्रनगर-गुजरात,असे त्याचे नाव आहे.दरम्यान त्याचा मृतदेह आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेमळे-पाटकरवाडी येथील ट्रॅकवर आढळला.याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की,मृत तरुण आपल्या नातेवाईकांसोबत कारवार येथे कामाला आला होता .दरम्यान ते काल त्या ठिकाणाहून घरी जायला गुजरातच्या दिशेने निघाले .यावेळी मृत वाघेला हा ट्रेनमधून खाली पडला.मात्र याबाबत कोणालाही कल्पना नव्हती.दरम्यान ट्रेन सिंधुदुर्गनगरी येथे थांबली असता त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना तो ट्रेनमध्ये आढळला नाही.त्यामुळे ते सर्व नातेवाईक त्याठिकाणी उतरून पुन्हा मागच्या प्रवासाला त्याचा शोध घेण्यासाठी निघाले, दरम्यान या ठिकाणची माहिती नसल्यामुळे ते पुन्हा मडगाव येथे पोचले, त्याचा शोध सुरू असतानाच आज त्याचा मृतदेह नेमळे येथे रेल्वे ट्रॅक वर आढळला.याबाबतची माहिती त्याच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना देण्यात आली.दरम्यान त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटली. व मृतदेह ताब्यात घेतला.