काल रात्रीची घटना; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल…
कणकवली, ता.२३: महामार्गालगतच्या तेलीआळी डीपीरोवर भाजी विक्रीचे दुकान लावल्याच्या कारणातून भाजी विक्रेत्या महिलेसह तिचा मुलगा आणि कामगाराला मारहाणीची घटना काल (ता.22) रात्री दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील सहा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
जानकी दयानंद कांबळी (वय 45, रा.तेलीआळी) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार सहा संशयित रात्री दहाच्या सुमारास आपल्या दुकानाजवळ आले.त्यांनी यापुढे तेलीआळी डीपीरोवर दुकान लावायचे नाही असा दम दिला. त्यावेळी चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतर आम्ही आमच्या मूळ दुकानाकडे जाऊ असे सांगितले. मात्र त्या सहा संशयितांनी भाजी ठेवण्याच्या क्रेटने तसेच कंबरपट्ट्याने मारहाण केली. यात स्वतःसह मुलगा विजय कांबळी आणि कामगार संदीप असे जखमी झाले. मारहाणीच्या घटनेवेळी मंगळसूत्र देखील गहाळ झाले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. जानकी कांबळी यांच्या तक्रारीवरून संशयित उमेश आरोलकर, प्रसाद आरोलकर, वैभव आरोलकर, संदीप आरोलकर, भाऊ आरोलकर आणि सोनू भंडारी (सर्व रा.तेळीआळी) या संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आले आहे.