एसटीच्या निवृत्त कर्मचारी संघटनेचे छेडले धरणे आंदोलन…

87
2

कणकवली, ता.२३ : राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसदर्भात येथील विभाग नियंत्रक कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सातत्याने मागणी करूनही पूर्तता होत नसल्याने हे आंदोलन छेडण्यात येत असून मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. तर आंदोलनकर्त्यांनी विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी एल. आर. गोसावी यांनी भेट घेत आपल्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठवून पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सदानंद आपटे, सचिव मनोहर आरोलकर, प्रकाश साखरे, सदानंद रासम, अशोक राणे, राजन कोरगांवकर, चंद्रकांत जैतापकर, सुधाकर मोरजकर, रमेश धामापूरकर, नरेश राणे, कांता झगडे, प्रदीपकुमार जाधव, एच. बी. पटेल, रविकांत परब, रमेश निकम, सुभाष खोचरे व इतर उपस्थित होते.
यावेळी करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये उपदान कायद्यानुसार सेवानिवृत्तांना उपदानाची रक्कम एक महिन्याच्या आत मिळाली पाहिजे. सोबत कर्मचार्‍यांना उपदान रकमेचा अंकेक्षित गोषवारा मिळावा. निवृत्त कर्मचार्‍यांना वेतनवाढीच्या फरकाची रक्कम एकरकमी देण्यात यावी. १ डिसेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार मुद्दा क्र. १२ मध्ये विधवा- विधूर यांना मोफत सेवा पास देताना त्यांचे वय ७५ वरून ६५ करण्यात आले. वास्तविक सेवानिवत्त कर्मचारी व त्यांची पत्नी/ पती यांना वयाची अट नाही. तशीच कार्यवाही विधवा/ विधूर यांच्याबाबतीत असावी व त्यांनाही सहा महिन्यांचा मोफत प्रवास पास देण्यात यावा. आता महामंडळाने लालपरी व निमआराम बसेस धावताना दिसत नाहीत. त्याऐवजी नवीन नामकरण केलेल्या सर्व रा. प. गाड्यांमधून विनामूल्य प्रवासाची सवलत देण्यात यावी. मोफत पासाची मुदत जानेवारी ते डिसेंबर अशी असावी. मोफत पास सहा महिने अनुज्ञेय न ठेवता दोन-दोन महिन्यांचे तीन पास देण्यात यावेत. तांत्रिक कर्मचार्‍यांना (चालक) स्वेच्छानिवृत्ती नसल्याकारणाने ते वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असताना त्यांच्याकडून स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज न स्विकारता राजीनामा घेण्यात आलेत. तरी त्यांच्या सेवेचा विचार होऊन त्यांना उपरोक्त संदर्भीय मोफत पास देण्यात यावा. म्हणजेच राजीनामा दिलेल्या कर्मचार्‍यांचाही यात समावेश करावा. तसेच वेतनवाढ १ एप्रिल२०१६ पासून लागू करण्यात यावी व त्यापासूनचाच फरक अदा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन छेडण्यात आले.

4