जांभा दगड बेकायदा उत्खनन प्रकरणातील संशयिताचे पलायन…

143
2

बांदा येथिल घटना;संशयित
गोव्यातील, महसूलने केलेली कारवाई

बांदा ता.२३:
नेतर्डे येथे बेकायदा सुरू असलेल्या जांभ्या दगडाच्या खाणीवर आज तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने सायंकाळी उशिरा धाड टाकून कारवाई केली. याप्रकरणी गोव्यातील एका संशयिताला पकडून बांदा पोलीस ठाण्यात आणताना संशयिताने काळोखाचा फायदा घेत पोलीस व तहसीलदारांसमक्षच पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तहसीलदार म्हात्रे यांनी तक्रार दिल्याने याप्रकरणी बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तहसीलदार कार्यालयात आज महसूल मंडळ अधिकारी व तालुक्यातील तलाठी यांची बैठक सुरू होती. सायंकाळी उशिरा तहसीलदार म्हात्रे यांना नेतर्डे येथे बेकायदा जांभ्या दगडाची खाण सुरू असल्याची तक्रार मिळाली. त्यांनी लागलीच बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी व महसूल कर्मचारी यांना सोबत घेऊन नेतर्डे गाठले.
रात्रीच्या अंधारात त्यांनी कारवाई करत गोव्यातील एका व्यावसायिकाला ताब्यात घेतले. महसूल पथक संशयिताला घेऊन सायंकाळी उशिरा बांदा पोलिस ठाण्यात आले. यावेळी संशयितांची कॅनटर (मालवाहू गाडी) देखील सोबत होती. बांदा पोलीस ठाण्यात प्रवेश करताना संशयिताने अंधाराचा फायदा घेत तेथून पलायन केले. अचानक संशयित पळून गेल्याने तहसीलदार म्हात्रे, महसूल पथक व पोलीस कर्मचारी भांबावून गेलेत. पोलिसांनी संशयिताला पोलीस ठाणे आवारात व खाली बाजारपेठ पर्यंत पाठलाग करून शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयित पसार होण्यात यशस्वी झाला. बांदा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.
संशयितांची कॅनटर पोलीस ठाणे आवारात आहे. त्यामुळे संबंधित संशयिताच्या मालकाला संपर्क साधण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली. याप्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, मात्र अद्यापपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती जाधव यांनी दिली.

4