कणकवली, ता.२४: राष्ट्रीय नागरीकत्व नोंदणी तसेच नागरीकत्व सुधारणा या कायद्या विरोधात बहुजन वंचित आघाडीने आज कणकवलीत मोर्चा काढला. या दोन्ही कायद्यात सुधारणा करावी या मागणीचे निवेदनही प्रांताधिकार्यांना देण्यात आले.
शहरातील पटकीदेवी मंदिरापासून वंचित आघाडीच्या मोर्चाला सुरवात झाली. बाजारपेठ आणि राष्ट्रीय महामार्गावरून हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात आणण्यात आला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर, राष्ट्रसेवादलाचे कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर, सुदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन दिले. या निवेदनात एनआरसी आणि सीएए या दोन्ही कायद्यामुळे देशभरात होत असलेला प्रंचड जनक्षोभ निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या कायद्यांमुळे देशाची अखंडता, सर्व जाती धर्मामधील बंधुतेला धक्का पोचणार आहे. अनेक नागरिक आपल्या देशात निर्वासित होणार आहेत. त्यामुळे या कायद्याचा फेरविचार करावा. हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.