पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची जिल्हा परिषदे कडून काळजी…

225
2

दोन रुग्णवाहिका सोबत,पुरेसा औषध साठा देऊन पथके रवाना…

ओरोस ता.२४: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या ‘सिंधु पाऊले चालती पंढरीची वाट’ या नाविन्यपूर्ण योजनेतून सलग पाचव्या वर्षीहि पायी चालत पंढपुरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी जिल्हा परिषदकडून घेण्यात आली आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यां सोबत दोन रुग्णवाहिका, पुरेसा औषध साठा घेवून दोन आरोग्य पथके रवाना झाली असून वारी पंढरपुर ला जावून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येईपर्यंत ही आरोग्य पथके वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याची माहिती जिप आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्याभरातून अनेक वारकरी पायी वारी करतात. या वारकऱ्यांच्या आरोग्याची वारी दरम्यान काळजी घेता यावी, त्यांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिप आरोग्य विभागाने सन 2016 पासून “सिंधु पाऊले चालती पंढरीची वाट” योजना सुरु केलि. या योजनेंतर्गत दोन आरोग्य पथके आवश्यक औषध साठ्यासह वारकऱ्यांसोबत पाठविली जातात. ही पथके वारी पूर्ण होईपर्यंत त्यांच्या सोबत राहून वारकऱ्यांची काळजी घेतात. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे. सिंधुदुर्ग ते पंढरपूर तीर्थक्षेत्र अशी हि सेवा राहणार आहे. यात दोन रुग्णवाहिका व दोन आरोग्य पथके राहणार आहेत. 21 जानेवारी रोजी ही दोन्ही आरोग्य पथके वारी सोबत रवाना झाली आहेत. यात 21 जानेवारी रोजी कणकवली येथील भालचंद्र बाबा मठ येथे जिप आरोग्य समिती सभापती सावी लोके यांच्या हस्ते एका रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला. ती गगनबावडा मार्गे पंढरपूर येथे तर दुसऱ्या रुग्णवाहिकेचा माणगांव येथील टेंबेस्वामी मठ येथे जेष्ठ वारकरी गोसावी महाराज यांच्या हस्ते शुभारंभ होऊन ती वारकऱ्यांसोबत आंबोली-कोल्हापूर मार्गे पंढरपूर येथे जाणार आहे. ही आरोग्य सेवा 21 जानेवारी ते 6 फ्रेब्रुवारी 2020 पर्यंत देन्यात येणार आहे.
माणगांव मधील आरोग्य पथकात डॉ के डी कोळी, यशवंत गोसावी, श्रीम. एस एस साळगावकर, काका परब यांचा समावेश असून हे आरोग्य पथक माणगांव दिंडी, आंबेगाव दिंडी, निळेली दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवीणार आहे. तर कणकवली मधील आरोग्य पथकात डॉ जी एम महेंद्रकर, एम बी काळसेकर, श्रीम. व्ही एस वारंग, पांडुरंग चव्हाण यांचा समावेश असून हे पथक कणकवली दिंडी,कुडाळ दिंडी, नेर्ले दिंडी मधील वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवीणार आहेत.

4