सावंतवाडीत भर दिवसा दोन घरे फोडली…

226
2

माजगाव,खासकीलवाडा येथील घटना;८ लाखांचा मुद्देमाल लंपास…

सावंतवाडी ता.२४:  शहरात माजगाव व खासकीलवाडा परिसरात आज भर दिवसा अज्ञात चोरटयांकडून घरफोडी करण्यात आली.यात दोन घरे फोडण्यात आली असून दोन्ही घरफोडीतील रोकड व सोन्या-चांदीचे दागिने मिळून एकूण तब्बल ८ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.या प्रकाराबाबत भक्ती भरत गवस (८५) व अनुष्का आनंद देसाई (२६) यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनेक दिवसांनी शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आता सावंतवाडी पोलीसां समोर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,माजगाव गरड येथे झालेल्या चोरीत सौ.देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून आपल्या मुलांना आणण्यासाठी शाळेत गेल्या होत्या.दरम्यान त्या पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घरी परतल्या असता त्यांना घराचा मुख्य दरवाजा ऊघडलेल्या अवस्थेत दिसला.दाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत आतील कपाटातील दोन मंगळसूत्र,एक डायमंडची अंगठी तर तीन सोन्याच्या अंगठ्या,तीन सोन्याच्या गळ्यातील चैन व २२ हजार रुपयांची रोख रक्कम मिळून एकूण ३ लाख ४५ हजार चा मुद्देमाल लंपास केला आहे.
तर खासकीलवाडा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी गवस यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार,सोन्याचे मंगळसूत्र,हातातील तोडे,चपलाहार,कानातील रिंग व कुडी,नाकातील नथ,चांदीची देवाकडील भांडी व रोख रक्कम मिळून एकूण सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. दरम्यान दोन्ही ठिकाणी झालेल्या चोरी प्रकरणात एकाच टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान याबाबत पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

4