मुंबई, ता.२४: राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२०-२१ च्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ११८ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी देण्यात आली.अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मंत्रालयात उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस खासदार विनायक राऊत, माजी वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते.
श्री. सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, मालवण नगरपरिषद येथे म्युझिकल फाऊंटन बसविणे, देवगड नगरपंचायत येथे पर्यटन सुविधा उपलब्ध करून देणे, मालवण नगरपरिषद क्षेत्रात ओपन जीम बसविणे, सायन्स सेंटर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एमपीएससी आणि युपीएससी स्पर्धा परीक्षांकरिता क्लासरूम आणि वाचनालय तयार करणे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इ-लर्निंग सुविधा पुरविणे, मालवण वेंगुर्ला नगरपालिका क्षेत्रात बायोकंपोस्ट मशीन बसवणे, अपारंपरिक ऊर्जा योजनेअंतर्गत कामे करणे,आरोग्य, शिक्षण, सागरी मत्स्यव्यवसाय याकडे विशेष लक्ष देऊन जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.