भाजपाचे उद्या सावंतवाडीत उपोषण…

137
2

महेश सारंग; महामार्ग डांबरीकरण,काजरकोंड पुलासाठी निधीची मागणी…

सावंतवाडी ता.२५: जुन्या मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ करण्यात यावे,तसेच सावंतवाडी शहराला जोडणाऱ्या कोलगाव येथील काजरकोंड पुलासाठी तात्काळ निधी मंजूर करण्यात यावा,या मागणीसाठी उद्या दि.२६ जानेवारीला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भाजपाकडुन उपोषण करण्यात येणार आहे.असा इशारा भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.दरम्यान या पुलासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे,असे आश्वासन माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते.मात्र त्यांनी लोकांची दिशाभूल केली,असाही आरोप यावेळी श्री.सारंग यांनी केला.

आज या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी तालुकाध्यक्ष संदीप गावडे, सिद्धार्थ भांबुरे, निशांत तोरसकर, धनश्री गावकर, बाबा कोरगावकर, झेवियर फर्नांडिस, प्रसाद अरविंदेकर, विकी केरकर आदी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, सावंतवाडी शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा या जुन्या महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे.त्यामुळे त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहे.वारंवार रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे,अशी मागणी करून सुद्धा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.तर दुसरीकडे सावंतवाडी व कोलगावला जोडणाऱ्या काजरकोंड पुलाला निधी नसल्यामुळे या पुलाचे काम रेंगाळले आहे.पावसाळ्यात पुलावर पाणी असल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटतो, ही अनेक वर्षे समस्या आहे.त्यामुळे यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी आम्ही उद्या भाजपाकडून उपोषणाचा इशारा दिला आहे.या वेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.

4