जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी; सिंधुदुर्गनगरीत १० वा मतदान दिन संपन्न…
सिंधुदुर्गनगरी ता.२५: मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे नागरी कर्तव्य असून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी आज येथे केले.येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये आज १० व्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन कराताना त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड, भूसंपादन शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.
मतदान जागृतीसाठी स्वीप हा एक महत्वाचा आणि लाभदायक कार्यक्रम असल्याचे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या की, स्वीप अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूकीवेळी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी, चित्रकला अशा विविध स्पर्धांसह, प्रभात फेरी, फ्लॅश मॉब, दशावतार अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदाना विषयी जागृती करण्यात आली होती. आजही या ठिकणी मुलांनी सुंदर शब्दांमध्ये आजच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आपणास सांगितले आहे. देशातील प्रत्येक नागरिकांने कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे, निवडणूक हा राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव मतदानाने साजरा करावयाचा असतो. आजच्या आपल्या लोकशाहीचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात आहे. त्यामुळे तरुणांनी मतदानामध्ये सक्रीय भाग घ्यावा असे आवाहन श्रीमती के.मंजुलक्ष्मी यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी राष्ट्रीय मतदार दिवस का साजरा केला जातो या विषयी माहिती दिली. तसेच निवडणूक प्रक्रिया व मतदानाचे महत्व सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी शिवराज मराठा विद्यालय साळगाव, ता. सावंतवाडी या विद्यालयाची विद्यार्थीनी गायत्री प्रमोद खानोलकर, पाटकर हायस्कूल वेंगुर्ल्याची मनिषा धोंडू शिंदे, कणकवली कॉलेजचा सुनिल गणेश बाकरे व आरपीडी हायस्कूल सावंतवाडीची विद्यार्थीनी तन्वी गणेश परब यांनी मतदान एक राष्ट्रीय कर्तव्य या विषयावर भाषण सादर केली. या भाषण सादर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वकृत्व स्पर्धेतील त्यांच्या यशा बद्दल प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मतदान जागृतीविषयी आयोजित निबध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा या विविध स्पर्धांमधील सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुडळाचे सहाय्यक तालुका कृषि अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन उप जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, शिक्षक यांच्यासह नागरीक उपस्थित होते.