Saturday, December 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedनिधी घटल्याने सिंधुदुर्गची विकास प्रक्रिया ठप्प होण्याची भीती...

निधी घटल्याने सिंधुदुर्गची विकास प्रक्रिया ठप्प होण्याची भीती…

नीतेश राणे; माजी पालकमंत्र्यांच्या नाकर्तेपणामुळे निधी अखर्चित…

कणकवली, ता.२५: जिल्हा नियोजनचा आराखडा २४० कोटींवरून ११८ कोटी पर्यंत कमी झाला आहे.यामुळे सिंधुदुर्गची विकास प्रक्रियाच ठप्प होणार असल्याची भीती आमदार नीतेश राणे यांनी आज व्यक्त केली.पालकमंत्र्यांसह शिवसेना आमदारांचे वजन नसल्याने ते जिल्ह्याचा निधी वाढवू शकले नाहीत.माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या नाकर्तेपणामुळेही गतवर्षीचा ४० टक्के निधी अखर्चित राहिला.त्यामुळे देखील जिल्हा नियोजनचा निधी कमी झाला असल्याचा आरोप आमदार नीतेश राणे यांनी आज केला.
येथील प्रहार भवन मध्ये श्री.राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, जिल्हा नियोजनच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे अखर्चित निधीबाबत सावधगिरीचा इशारा दिला होता. तसेच या निधीच्या खर्चाचे नियोजन झाल्याखेरीज अर्थमंत्री अजित पवार जिल्ह्याचे बजेट वाढवणार नाहीत असे स्पष्ट सांगितले होते. पण पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आमदार वैभव नाईक यांनी तर जिल्हा नियोजनचा आपणास किती दांडगा अभ्यास आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तर पालकमंत्र्यांनी आपण 240 कोटींचा निधी आणणारच असं आश्वासित केलं. पण शेवटी राणेसाहेबांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली. जिल्हा नियोजनच्या आराखड्यास कात्री लागली असून अवघ्या 118 कोटींवर जिल्ह्याची बोळवण करण्यात आली आहे.
श्री.राणे म्हणाले, नारायण राणेंनी जिल्ह्याची विकास प्रक्रिया गतिमान केली होती. राणे मंत्रीमंडळात असताना अजित पवार हेच वित्तमंत्री होते. राणेंच्या शब्दाखातर त्यांनी सीवर्ल्डसाठी 100 कोटीचा निधी दिला होता. तसेच जिल्हा नियोजनसाठीही भरघोस निधी दिला होता. मात्र सिंधुदुर्गात पोकळ वल्गना करणार्‍या आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांचे मंत्रालयात वजन राहिलेले नाही. त्यामुळे नियोजनचा निधी कमी झाला आहे.
मागील पाच वर्षे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंधुदुर्गला निधी कमी पडू दिला नव्हता. आता तीन पक्षाचे सरकार आल्यानंतर मात्र सिंधुदुर्गच्या निधीला कात्री लागली आहे. आधीच विकास कामांना स्थगिती असल्याने जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. आता जिल्हा नियोजचा निधीही कमी झाल्याने जिल्ह्यात पुन्हा मनीऑर्डर संस्कृती येण्याची भीती आहे. दरम्यान कोकण हा शिवसेनेचा कणा मानला जातो. मात्र महाआघाडी सरकारमध्ये शिवसेनेचा कणाच मोडला असल्याचेही श्री.राणे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments