मालवण, ता. २५ : आमदार वैभव नाईक व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या पाठपुराव्यातुन मालवण पालिकेच्या अग्निशमन केंद्रासाठी २ कोटीचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या या निधीतून नगरपरिषद अग्निशमन दल केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० मधून अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण या योजनेअंतर्गत मंजूर व अर्थसंकल्पीत २ कोटी ५० लाखाची तरतूद करण्यात आली. या निधीतुन मालवण पालिकेत अग्निशमन दल केंद्र होण्यासाठी आमदार वैभव नाईक व नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केला होता. त्यानुसार मालवण नगरपरिषद अग्निशमन दल केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकाम यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्ण अंदाजपत्रकीय रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती आमदार नाईक यांनी दिली आहे.
पूर्वीच्या सत्ताधारी यांच्या काळात अग्निशमन योजना मंजूर झाली होती. टेंडरही झाले, ठेकेदाराने काम सुरू केले मात्र काम अर्धवट टाकून ठेकेदार निघून गेला. त्यामुळे निधीही मागे गेला होता. आता पुन्हा निधी मंजूर झाला आहे.



