शालेय विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड द्यावे…

2

शिवसेना महिला आघाडीकडून पालकमंत्र्यांना प्रस्ताव सादर ; जान्हवी सावंत यांची माहिती…

मालवण, ता. २५ : जिल्ह्यातील ११ ते १९ वर्षे वयोगटातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना जिल्हा नियोजनच्या नावीन्यपूर्ण योजनेतंर्गत पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करून द्यावे अशा मागणीचा प्रस्ताव शिवसेना जिल्हा महिला विकास आघाडीच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. याला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला असून उद्याच्या जिल्हा दौर्‍यात ते निर्णय घेतील असा विश्‍वास जिल्हा महिला विकास आघाडी अध्यक्षा जान्हवी सावंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मालवण पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी पूनम चव्हाण, रश्मी परुळेकर, पूजा तोंडवळकर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. जिल्ह्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना पाच रुपयांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जात आहे. काही शाळांमध्ये वेन्डीगच्या मशीनही नाहीत. जिल्ह्यात मुलींची संख्या जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना जिल्हा नियोजनच्या हेडमधून नावीन्यपूर्ण योजनेतंर्गत पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करून द्यावीत असा प्रस्ताव पालकमंत्री श्री. सामंत यांना सादर करण्यात आला आहे. त्याला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. उद्या यावरील निर्णय अपेक्षित असून ८ मार्चपर्यंत त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू होईल असे सौ. सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात महिलांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या आहे. जाणीवजागृती अभियानाच्या निमित्ताने मुलींमध्ये गर्भाशयाशी निगडित आजार असल्याचे आढळून आले आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जिल्ह्यात योजना कार्यान्वित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यापुढे जिल्हा महिला विकास आघाडी ही आरोग्य विषयावरच जास्त लक्ष केंद्रित करणार असून अ‍ॅनेमियामुक्त अभियान येत्या काळात राबविले जाणार आहे. याला पालकमंत्र्यांचे सहकार्य लाभेल असेही सौ. सावंत यांनी स्पष्ट केले.

3

4