मच्छीमारांच्या गुप्त बैठकीत निर्णय…
मालवण, ता. २५ : अनधिकृत एलईडी, पर्ससीन मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मच्छीमारांच्यावतीने उद्या सिंधुदुर्गनगरी येथे अनोखे आंदोलन छेडण्यात येणार आहे. आज झालेल्या मच्छीमारांच्या गुप्त बैठकीत याबाबतचा निर्णय झाला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड मच्छीमार समन्वय समितीच्यावतीने तिन्ही जिल्ह्यात अनधिकृत एलईडी, पर्ससीन मासेमारीच्या विरोधात धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा अनोखे आंदोलन छेडणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सध्या जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अवैधरित्या एलईडी पर्ससीन मासेमारी सुरू असून मत्स्यव्यवसाय विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने मच्छीमारांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या पारंपरिक मच्छीमारांच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथे अनोखे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मच्छीमारांच्या झालेल्या गुप्त बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे कळते.