चोरटा सीसीटीव्हीत कैद; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बांदा ता.२७: आंगडीवाडी येथील नसीरखान अब्दुलखान बिजली यांच्या रॉयल कॅश्यू प्लाझा या दुकानात धाडसी चोरी झाली.या चोरी प्रकरणात २० हजार रुपयांची रोकड व २० हजार रुपयांचे काजूगर अशी एकूण ४० हजार रुपयांची चोरी झाली आहे. २१ जानेवारी रोजी मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये दिसत आहे. तशी फिर्याद नसीरखान बिजली यांनी बांदा पोलीसांत दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नसीरखान बिजली हे पुणे येथे आपल्या नातलगांकडे गेले होते. ती संधी साधून चोरट्याने २१ जानेवारीच्या मध्यरात्री दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला. दुकानातील २० हजारांच्या रोकडसह १० किलो काजूगरांच्या दोन पिशव्या चोरुन नेल्या. त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत २० हजार रुपये आहे. २६ जानेवारी रोजी दुकान उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. चोरटा माहितगार असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहे.