कणकवली, ता.२७: कणकवली नगरपंचायतीचा सन सन 2020-21 चा 4 कोटी 20 लाख 90 हजार 578 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभेत आज सादर करण्यात आला. एकूण 64 कोटी 8 लाख 85 हजार 593 रुपये खर्चाचा हा अर्थसंकल्प आहे. या सभेत मुडेश्वर स्टेडियमसाठी भूसंपादन, पोस्ट खात्याची जागा रस्त्यासाठी संपादन करणे या विषयावर चर्चा झाली.
कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात आज अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यासह नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतीचा मागील वर्षाचा म्हणजेच 2019-20 चा अर्थसंकल्प 41 कोटी 24लाख 8हजार 78 रुपयांचा होता. तर यंदाचा अर्थसंकल्प 64 कोटी 8 लाख 85 हजार रुपयांचा आहे. हा अर्थसंकल्प शिलकी असून 4 कोटी 20 लाख 90 हजार 578 रुपये नगरपंचायतीकडे शिल्लक रहाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नगरपंचायत सभेत सुरवातीला स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेल्या शिशिर परुळेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव बंडू हर्णे यांनी मांडला. त्याला कन्हैया पारकर यांनी अनुमोदन दिले. मात्र श्री.हर्णे यांनी त्याला आक्षेप घेतला. स्वीकृत नगरसेवकाला अनुमोदन देत येत नाही. त्यामुळे निवडून आलेल्या अन्य नगरसेवकांनी अनुमोदन द्यावे असा मुद्दा श्री.हर्णे यांनी मांडला. तर कन्हैया पारकर यांनी याबाबत मुख्याधिकारी यांनी मार्गदर्शन करावे असे स्पष्ट केले. मुख्याधिकारी श्री.पिंपळे यांनी स्वीकृत नगरसेवक सूचक किंवा अनुमोदक राहू शकतात असे म्हणणे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी मांडले.
सभेत मुडेश्वर स्टेडियमसाठी भूसंपादनाचा मुद्दा चर्चेला आला. राष्ट्रवादीचे अबिद नाईक यांनी नगरपंचायतीकडून राज्य शासनाला प्रस्ताव जात नसल्याने निधी येत नसल्याचा आरोप केला. तसेच प्रस्ताव पाठवा आम्ही निधीसाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनीही कणकवली शहराच्या विकासाच्या प्रश्नांवर राज्यस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या वर्षी आश्वासन देऊनही स्टेडियमच्या भूसंपादनासाठी रुपया दिला नसल्याचे बंडू हर्णे, अभिजित मुसळे म्हणाले. आता राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे विरोधी नगरसेवकांनी खेळपट्टी विकसित होईल एवढा तरी निधी आणा, त्यासाठी आपल्या नेत्यांचे वजन वापरा असे आवाहन केले.
आचरा बायपास रस्त्यामध्ये पोस्ट खात्याची जागा आहे. ही जागा ताब्यात घेण्याबाबत पोस्ट खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांची चर्चा करून देखील हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे रस्त्यासाठी जेवढे क्षेत्र आरक्षित आहे. ते ताब्यात घेण्यासाठी रीतसर भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय आजच्या नगरपंचायत सभेत घेण्यात आला.
कणकवली नगरपंचायतीचा ४.२० कोटीचा शिल्लकी अर्थसंकल्प
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES