बँक अधिकारी व ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधिकार्यांच्या बैठकीत निर्णय…
बांदा.ता,२८: बांदा शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यक्रमाने सेवा देण्यात येईल, तसेच ज्येष्ठांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्यात येईल असा निर्णय सर्व बँकांच्या शाखाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात बँक अधिकारी व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी बँक अधिकाऱ्यांनी ज्येष्ठांच्या अडचणी व समस्या समजून घेण्याची विनंती केली. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन खाती मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र शाखेतील गर्दीमुळे जेष्ठांना बँक व्यवहार करराना त्रासाचे व अडचणीचे ठरत आहे.
यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक संघाने सर्व बँक अधिकाऱ्यांना पत्र देऊन सहकार्य करण्याची विनंती केली होती. बांदा मराठा समाजाने देखील ज्येष्ठांच्या समस्या मांडल्या होत्या. मात्र याची अंमलबजावणी होत नसल्याने पोलीस ठाण्यात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग ठेवावी, ज्येष्ठांना सेवेमध्ये प्राधान्य द्यावे, काउंटरवर ज्येष्ठांसाठी फलक लावण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या. सर्व शाखाधिकाऱ्यांनी सर्व मागण्या मान्य करत त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, उपाध्यक्ष हनुमंत सावंत, सचिव गुरुनाथ नार्वेकर, खजिनदार जगन्नाथ सातोस्कर, महादेव वसकर, तुळशीदास धामापूरकर, अंकुश माजगावकर आदी उपस्थित होते.