महामार्ग चौपदरीकरण : ६ महिन्यात नव्या पुलाची उभारणी
कणकवली, ता.२८ : कणकवली शहरालगतचा जानवली नदीवरील ब्रिटिशकालीन पूल आज महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत जमीनदोस्त करण्यात आला. गेली ८५ वर्षे या पुलावरून वाहतूक सुरू होती. या पुलाच्या ठिकाणी आता पुढील ६ सहा महिन्यात नवीन पूल उभा केला जाणार आहे.
मुंबई आणि गोवा ही दोन शहरे रस्ता मार्गे जोडण्यासाठी ब्रिटिशांनी 1930 पासून कोकणातील नद्यांवर पुलांची उभारणी सुरू केली. यात जानवली नदीवरील पुलाचे काम 1931 मध्ये सुरू झाले. 4 नोव्हेंबर 1934 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी कार्यान्वित झाला. या पुलासाठी त्यावेळी 1 लाख 37 हजार 669 रुपये अंदाजित खर्च होता. प्रत्यक्षात 1 लाख 22 हजार 500 रूपये एवढा खर्च आला.
“गॅनन डंकर्ले आणि कंपनी’च्या अभियंत्यांनी या पुलाच्या उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले होते. पुलाचे तत्कालीन अभियंता ए. एच. व्हाईट, एच. जे. एस. कझिन्स आणि एस. ए. मिर्झा, पा. कृ. शिंदे, कृ. जा. मोहिते यांच्या देखरेखीखाली या पुलाचे काम करण्यात आले. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्याहस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या पुलावरून कित्येक टनांची अवजड वाहतूक अव्याहतपणे सुरू होती.
महामार्ग चौपदरीकरणात मुंबई गोवा महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल तोडले जात आहेत. यापूर्वी कणकवली शहरालगतच्या गडनदीवरील पूल तोडून तेथे तीन पदरी दोन पूल बांधण्यात आले आहेत. जानवली नदीवर देखील 2014 मध्ये नव्या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले; मात्र मुख्य कंपनी आणि पोट ठेकेदार यांच्या वादात या पुलाचे काम गेली पाच वर्षे रेंगाळले होते. अखेर महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने गेल्या महिन्यात नव्या पुलाचे काम पूर्ण केले आणि त्यावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर ब्रिटिशकालीन पूल तोडण्याची कार्यवाही करण्यात आली.