आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक
वेंगुर्ले.ता.२८:
तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा वेतोरे नंबर एक मध्ये आगळावेगळा असा चिमुकल्यांचा आठवडी बाजार शाळेच्या पटांगणात शाळेच्या वतीने भरविण्यात आला. त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला.
यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आरती शेणवी म्हणाल्या की, शालेय जीवनापासून मुलांना व्यवहारज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेला बाल बाजार हा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थी हा केवळ अभ्यासात नाहीतर व्यवहारात सुद्धा हुशार असणे गरजेचे आहे. त्यामुळे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक प्रियांका बालम, रवींद्र नाईक, सिद्धार्थ नाईक,सुशांत नाईक, यांसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या चिमुकल्यांच्या बाजारात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची पालेभाजी, गावठी अंडी, चिंचा,आवळे,उकडे तांदूळ, विविध प्रकारची लोणची ,घरगुती बनवले जाणारे गोड पदार्थ, खाद्यपदार्थांमध्ये भेल सेंटर, कलिंगण स्टॉल, चहा भजी हॉटेल अशा दुकानांचा यात समावेश होता. ग्रामस्थांनी मुलांच्या उपक्रमाचे कौतुक करीत विविध खाद्यपदार्थांची खरेदी व विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या बाजारातील उत्साह पाहून त्यांच्यात पालक, परिसरातील नागरिक व महिला बचत गटांच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या.
बाल बाजार या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कळते आणि बाजारात चालणारी कामे प्रत्यक्ष अनुभवयास मिळतात. गणिती क्रिया स्वतः करता येते त्यामुळे स्वावलंबन व चिकित्सक वृत्ती वाढीस लागते तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळत असल्यामुळे ते अधिक आनंददायी व चिरकाल स्मरणात राहते असे मत शाळेच्या मुख्याध्यापक प्रियांका बालम यांनी व्यक्त केले. केंद्रशाळा वेतोरे नंबर एक या शाळेने राबविलेला बाल बाजार उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेत अशा प्रकारे उपक्रम राबविल्यास यात विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञानाची व आर्थिक उलाढालीची आपसूक ओळख होण्यास मदत होईल यात मात्र शंका नाही अशा प्रतिक्रिया पालकांमधून व्यक्त होत होत्या.