Saturday, January 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारासायनिक प्रक्रियेद्वारे फळे पिकवणाऱ्यांवर कडक कारवाई करा...

रासायनिक प्रक्रियेद्वारे फळे पिकवणाऱ्यांवर कडक कारवाई करा…

के.मंजुलक्ष्मी; ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सूचना…

सिंधुदुर्गनगरी ता.२८: फळे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर करणारे व अशा प्रकराची प्रक्रिया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न झाली.या बैठकीवेळी श्रीमती के. मंजुलक्ष्मी यांनी या सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, पोलीस अधिक्षक कार्यालय, कृषि विभाग, विद्युत विभाग, बी.एस.एन.एल, अन्न व औषध प्रशासन, वजन व मापे विभाग यासह संबंधित सर्व विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या मांडण्यासाठी ग्राहक परिषद असल्याचे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या की, अन्न व औषध विभागाने फळ पिकवण्यासाठी रसायनांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा प्रकारे पिकवली फळे तपासणी करुन जप्त करावीत, जिल्ह्यात गर्भपातांच्या गोळ्यांच्या व्यापाऱ्यावर औषध प्रशासनाने नियंत्रण ठेवण्यासाठी योग्यती पावले उचलावीत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी अशासकीय सदस्यांनी वीज वितरण कंपनीचे फॉल्टी मीटर, मीटर बसवून न मिळणे, वीज बील भरणा न केल्यास वीज तोडणी करण्यापूर्वी किमान 8 दिवस आधी ग्राहकास त्यांची नोटीस देणे, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण लवकर करणे, आठवडी बाजारांमध्ये बेकरी उत्पादनांची विक्री होते त्यांची तपासणी करणे, त्यांचा परवाना तपासणे, तसेच वजन व मापे विभागाने या आठवडी बाजारांमधील विक्रेत्यांकडील वजनांची तपासणी करावी, तहसिलदार कार्यालयांमध्ये अशासकीय सदस्यांची यादी लावणे, ग्रामिण रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करणे, योजनांची प्रसिद्धी करणे असे मुद्दे उपस्थित केले.

वीज वितरण कंपनीच्या मीटर तसेच वायर तुटणे, पोल खराब होणे याविषयी सदस्य नकुल पार्सेकर, सुभाष गोवेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी वीज वितरण कंपनीस दिले, सदस्य राजेश नवांगुळ यांनी गर्भपातांच्या गोळ्या जिल्ह्यात सर्रास विक्री होत असल्याचे सांगून यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.

या परिषदेमध्ये अशासकीय सदस्य सर्वश्री नकुल पार्सेकर, सुभाष गोवेकर, सुरेश पाटील, अरुणानंद लाड, जयराम राऊळ, विलास कुबल, राजेश नवांगुळ, सुभाष बांबुळकर या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला. आभार प्रदर्शन नायब तहसिलदार श्री. गवस यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments