कणकवली शहराची घरपट्टी वाढणार…

2

२४ टक्के दराने आकारणी; मालमत्तांच्या फेरसर्व्हेक्षणाला न.पं.सभेत मंजूरी…

कणकवली, ता.२८:  कणकवली शहरातील सर्व मालमत्तांचे नव्याने सर्व्हेक्षण होणार आहे. यात प्रत्येक मालमत्तांची मोजमापे घेऊन मालमत्तांच्या मुल्यांकनानुसार 24 टक्के दराने घरपट्टीची आकारणी होणार आहे. शहरातील मालमत्तांचे फेरसर्व्हेक्षण आणि घरपट्टीवाढीला आज कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली.
नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा झाली. उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यासह बंडू हर्णे, अभिजित मुसळे, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, अबिद नाईक, मेघा सावंत, मेघा गांगण आदींनी सभेत विविध मुद्दयांवरील चर्चेत सहभाग घेतला.
नगरपालिका क्षेत्रात दर चार वर्षांनी मालमत्तांचे मुल्यांकन करून घरपट्टीची आकारणी करणे आवश्यक असते. मात्र कणकवली शहरात 2005 पासून घरपट्टीची वाढ झालेली नाही. मात्र आता पुढील काही दिवसांत शहरातील सर्वच मालमत्तांचे फेर सर्व्हेक्षण केले जाईल. त्यानंतर मालमत्तांच्या मुल्यांकनानुसार 24 टक्के दराने घरपट्टीची रक्कम ठरवली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी दिली. तर पूर्वीपेक्षा केवळ 2 टक्के दराने घरपट्टी वाढणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले. पूर्वी मालमत्ता मुल्यांकनाच्या 22 टक्के दराने घरपट्टीची आकारणी होत होती. आता 24 टक्के दराने घरपट्टीची रक्कम ठरवली जाणार आहे असेही श्री.नलावडे म्हणाले.

2

4