मालवण डिजिटल केबल नेटवर्कला सील…

2

केंद्रीय माहिती, प्रसारणच्या पथकाची कारवाई ; आवश्यक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना…

मालवण, ता. २८ : केबल नेटवर्कच्या प्रसारणासाठी आवश्यक मशीन, रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले नसल्याचा ठपका ठेवून केंद्र शासनाच्या माहिती प्रसारण मंत्रालय पुणे येथील डीएएस एमआयबीच्या पथकाने आज शहरातील मालवण डिजिटल केबल नेटवर्कवर कारवाई करून ते सील केले.ही कारवाई दुपारी करण्यात आली.याबाबतची माहिती पथकप्रमुख आशिषकुमार पंडित यांनी दिली.
शहरातील मुकेश बावकर यांच्या मालकीच्या मालवण डिजिटल केबल नेटवर्कला माहिती प्रसारण मंत्रालयाने आवश्यक बाबींची पूर्तता करण्याची वारंवार सूचना केली होती. मात्र त्यांनी याची कार्यवाही केली नाही. त्यामुळे आज दुपारी माहिती प्रसारणच्या पुणे येथील पथकाने मालवण डिजिटल केबल नेटवर्क येथे धडक देत तपासणी केली. यावेळी प्रसारणासाठी आवश्यक मशीन, कार्ड्स, रेकॉर्ड नसल्याचे तसेच अन्य काही त्रुटी आढळून आल्याने मालवण डिजिटल केबल नेटवर्क सील केले.
महसूल विभागाचे मंडळ अधिकारी रवींद्र निपाणीकर, विजय पास्ते, दीपक शिंगरे, अंकुश शिंदे, स्वप्नील साळकर तसेच पोलिस कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. आवश्यक मशीन तसेच अन्य बाबींची जोपर्यंत पूर्तता केली जात नाही तोपर्यंत मालवण डिजिटल केबल नेटवर्कचे प्रसारण बंद करण्यात आले आहे.

4

4