स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली…
मालवण, ता. २८ : शहरातील रांगोळी महाराज आश्रम येथे पर्यटकांच्या चालत्या लक्झरी बसला अचानक लागल्याची घटना आज दुपारी घडली. स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मुख्य रस्त्यावरील या घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली.
सांगली येथील पर्यटकांचा ग्रुप पर्यटनासाठी आज लक्झरीने येथे आला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सांगलीतील पर्यटकांची लक्झरी तारकर्लीहून मालवण बाजारपेठेच्या दिशेने येत होती. वायरी येथून लक्झरी जात असताना लक्झरीच्या पाठीमागील बाजूने धूर येत असल्याचे पाठीमागून येणार्या एसटीच्या चालकाने व दुचाकीस्वारांनी बघितले. त्यांनी रांगोळी महाराज आश्रम येथे पर्यटकांची लक्झरी तत्काळ थांबवली. लक्झरीच्या पाठीमागील भागास आग लागल्याचे दिसून आले. त्यानंतर प्रसंगावधान राखून लक्झरीतील पर्यटकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. स्थानिक नागरिक अमित सावंत याने आग विझविण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. सुदैवाने या दुर्घटनेत पर्यटकांना दुखापत झाली नाही.