सभापती, उपसभापती बुद्धिबळ चषक स्पर्धेचेही आयोजन ; पाताडे- परुळेकर यांची माहिती…
मालवण, ता. २८ : मालवण पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी इंग्लिश स्पिकींग डे साजरा करण्याचा जिल्ह्यातील पहिला नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याची कार्यवाही येत्या १ फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. त्याचबरोबर मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी, मेंदूचा विकास व्हावा यादृष्टीकोनातून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सभापती, उपसभापती चषक बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंचायत समितीच्या सभापती दालनात पत्रकार परिषद झाली. पंचायत समितीच्यावतीने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडील वाढता ओघ लक्षात घेता तो कमी व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी स्पिकींगची सवय व्हावी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी महिन्यातील प्रत्येक शनिवारी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्लिश स्पिकींग डे साजरा करण्यात येणार आहे. यात शाळेत प्रवेश केल्यापासून घरी जाईपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी एकमेकांसोबत इंग्लिशमधूनच संवाद साधायचा आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमावर पदाधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांचे नियंत्रण असणार आहे. या उपक्रमाचे परिपत्रक तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना पाठविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत तज्ज्ञांकडून आवश्यकता भासल्यास शिक्षकांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एप्रिल, मे महिन्यात या उपक्रमात अजून कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत याचा आढावा घेऊन त्यानुसार आवश्यक ती कार्यवाहीही केली जाणार आहे.
या उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथी आणि इयत्ता पाचवी ते आठवी अशा दोन गटात सभापती, उपसभापती चषक बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात घेतली जाणार आहे. सुरवातीस केंद्र स्तरावर ही स्पर्धा घेतली जाणार असून यातील विजेत्याला तालुकास्तरीय फेरीत प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र स्तरावरील विजेत्या, उपविजेत्यांना सभापती, उपसभापती चषक, पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे. तालुकास्तरावरील विजेत्या, उपविजेत्या स्पर्धकालाही सभापती, उपसभापती चषक, पारितोषिक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मुलांना बुद्धिबळ या खेळाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी चेस सर्कल संघटनेचे श्रीकृष्ण आडेलकर यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहितीही श्री. पाताडे, श्री. परुळेकर यांनी दिली.