दिल्ली दरबारी २ फेब्रुवारीला रंगणार नाईक मोचेमाडकर कंपनीचे “दशावतारी नाटक”…

2

 

शासनाच्या राष्ट्रीय महोत्सवात कोकणचे प्रतिनिधित्व करण्याची संधी…

वेंगुर्ले : ता.२८:
भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशातील विविध कलांचे प्रदर्शन करण्यासाठी नवी दिल्ली येथे भव्य असा “भारत रंगमहोत्सव” आयोजित केला आहे. या महोत्सवात कोकणचे नेतृत्व करण्याची संधी दशावतारी कला घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील मोचेमाड येथील पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ नाईक मोचेमाडकर यांना मिळाली आहे. उद्या २९ जानेवारी रोजी हे मंडळ दिल्ली दौऱ्यावर रवाना होत आहे.
कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी लोककला म्हणजे दशावतार. ही कला जोपासण्याचे काम पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ नाईक मोचेमाडकर करीत आहेत. त्यामुळे शासनाने या मंडळाला ही कला सादर करण्यासाठी दिल्ली येथे पाचारण केले आहे. नवी दिल्ली येथे शासनाच्या एन एस डी कॅम्पस मध्ये हा रंग महोत्सव होत आहे. या महोत्सवात २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता “विर बब्रुभान”हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. या नाट्यप्रयोगात मंडळाचे २५ कलाकार आपल्या कलेचे प्रदर्शन करणार आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मालक सोनू उर्फ बाबल नाईक व त्यांचे चिरंजीव तुषार नाईक, त्यांचे काका जयराम नाईक हे प्रयत्न करत आहेत. या दौऱ्याबाबत तुषार नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आपल्या कलेचे कोकणच्या वतीने प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने आम्हाला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यामुळे आमचे सर्व कलाकार ही कला दिल्ली दरबारी सादर करण्यासाठी स्वच्छ आहेत विशेष म्हणजे महोत्सव राष्ट्रीय पातळीवरचा असल्याने ही कला देश विदेशातील सर्व रसिकांना समजावी म्हणून मातृभाषा मराठी बरोबर राष्ट्रभाषा हिंदी व आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी मधूनही सर्वांसमोर अनुवादीत केली जाणार आहे.

6

4