चालक जखमी; लाकूडाची वाहतूक करताना घडला अपघात…
आंबोली ता.२९: चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे आंबोली घाटातील पंचवीस फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याची घटना घडली.हा अपघात काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला.यात चालक विजय मार्शेलकर (रा.झाराप) हे जखमी झाले आहेत.त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, गोठोस येथील श्री.प्रकाश मोर्ये यांचे जळाऊ लाकूड घेऊन श्री.मार्शेलकर हे आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन गोठोस ते बेळगाव असा प्रवास करीत होते .दरम्यान आंबोली येथील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी आले असता त्यांचा गाडीवरील ताबा अचानक सुटला.व त्यांच्या ताब्यात असलेला ट्रक तब्बल पंचवीस फूट खोल दरीत कोसळला.गाडी कोसळत असल्याचे लक्षात येतात श्री मार्शेलकर यांनी बाजूला उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.मात्र गाडीत मागे भरलेली लाकडे कोसळून चालकाच्या केबिनचा पूर्णता चक्काचूर झाला आहे.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू तेली व सहकारी राजेश गवस यांनी घटनास्थळी धाव घेतली.व जखमींना तात्काळ उपचारासाठी पाठविले.सकाळी अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्याचे काम सुरू होते.या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.