दोडामार्ग मधील घटना;एक युवक गंभीर जखमी
दोडामार्ग ता.२९: माध्यमिक शाळेचे स्नेहसंमेलन सुरू असताना शालेय मुलींची छेड काढणाऱ्या गोव्यातील युवकांना ग्रामस्थांनी बेदम चोप दिला.सावंतवाडी तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील गावात काल रात्री उशिरा हा प्रकार घडला.
गोव्यातील हे युवक मद्यधुंद अवस्थेत होते.ग्रामस्थांच्या बेदम मारहाणीत एक युवक गंभीर जखमी झाला.गोव्यातील काही युवक लग्न समारंभासाठी लगतच्या गावात आले होते.या दरम्यान शेजारच्या गावात माध्यमिक शाळेत स्नेहसंमेलन सुरू होते.वरातीचा कार्यक्रम आटोपल्यावर मद्यधुंद अवस्थेतील गोव्यातील दोन युवक माध्यमिक शाळेचे स्नेहसंमेलन सुरू असलेल्या ठिकाणी आले.या युवकांनी प्रथम शिक्षकांशी गैरवर्तन केले.शिक्षकांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.शिक्षकांनी त्या युवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,मात्र पार मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या या युवकांनी स्नेहसंमेलनासाठी आलेल्या शालेय मुलींचीही छेड काढली.यानंतर त्या युवकांना जाब विचारला.युवकांनी ग्रामस्थांना दुरुत्तर करत मुलींबाबत अश्लील टिपणी केल्याने ग्रामस्थांनी त्या युवकांना बेदम चोप दिला.या प्रकाराची लगतच्या गावात एकच चर्चा रंगली आहे.