दुरुस्ती करून वापरण्याची वेळ; २ कोटींचा फंड असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष…
ओरोस ता,२९:
जिल्हा परिषदेच्या 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांना सध्या वाहने उपलब्ध नाहीत. सध्या दुरुस्त करून ही वाहने वापरली जात आहेत. सर्व वाहने निर्लेखन योग्य झाली आहेत. पण नवीन वाहने खरेदी करण्यासाठी शासन स्वतंत्र निधी देत नाही. जिल्हा नियोजनकडे गेल्यावर्षी प्रस्ताव पाठविला, पण त्यांनी असमर्थता दर्शविली. वर्षाला 2 कोटी रूपये आमदार फंड असल्याने जिल्ह्यातील आमदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी सुस्थितित वाहन अभावी ही प्राथमिक आरोग्य केंद्रे कमकुवत बनत चालली आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची तहकूब सभा बुधवारी बॅ नाथ पै सभागृहात नूतन सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलिपे, सदस्य प्रीतेश राऊळ, राजेश कविटकर, लॉरेन्स मान्येकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वाहणांचा प्रश्न उपस्थित झाला असता डॉ खलिपे यांनी, जिल्ह्याती 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी 37 केंद्रांना वाहने मंजूर आहेत. केवळ वैभववाडी केंद्राला वाहन मंजूर नाही. 37 पैकी 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांची वाहने निर्लेखन योग्य झाली आहेत. देवगड तालुक्यातील मोंड आणि पडेल या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जुन्या जीप आहेत. या 9 गाड्या सध्या दुरुस्त करून वापराव्या लागत आहेत. कारण गाड्या नवीन घेण्यासाठी शासन स्वतंत्र निधी देत नाही. त्यामुळे आमदार फंड किंवा जिल्हा नियोजन मधून निधी प्राप्त करणे एवढाच पर्याय आहे. त्यात गतवर्षी चार वाहने आमदार फंडातून घेण्यात आली. त्याचवेळी जिल्हा नियोजनकडे वाहणांसाठी निधी मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठविला होता. पण जिल्हा नियोजन समितीने प्रस्ताव मंजूर केला नाही. परिणामी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाहने कशी उपलब्ध करायची ? असा प्रश्न आमच्यासमोर असल्याचे ते म्हणाले.