जयेंद्र परुळेकरांचा आक्षेप; पत्र्याच्या थिएटर पेक्षा कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
सावंतवाडी ता.३०: आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून येथे उभारण्यात येणाऱ्या कंटेनर थिएटरवरून वरून आज झालेल्या पालिका सभेत सत्ताधारी व विरोधक यांच्यात चांगलाच वादंग झाला.यावेळी जिमखाना येथील पार्किंगच्या जागेत हा थिएटर उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान अशाप्रकारे तात्पुरता पत्र्याचा थिएटर न करता कायमस्वरूपी उपाययोजना करा,पालिकेच्या भाजीमंडईच्या नव्या इमारतीत त्यासाठी तरतूद करा,अशी मागणी जयेंद्र परुळेकर यांनी केली.या विषयावरून नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी त्यांना अनुमोदन दिले.
दरम्यान यावेळी सत्ताधारी गट नेते परीमल नाईक, मनोज नाईक, नासीर शेख आदींनी त्यांना विरोध केला.आदी सुरुवात तरी करुया.त्यानंतर पुढची उपायोजना करू,असे सांगून त्यांनी परूळेकर यांची मागणी उडवून लावली.यावेळी आपला विरोध नाही.मात्र खर्च करताना योग्य तो निर्णय घ्या,असे परूळेकर यांनी सांगितले.
सावंतवाडी पालिकेची मासिक सभा आज नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली.श्री.परब हे नगराध्यक्ष झाल्यानंतर पहिलीच सभा होती.त्यामुळे नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होईल याबाबत प्रश्नचिन्ह होते.यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी गट नेते नगरसेवक परुळेकर यांनी सत्ताधार्यांना विरोध दर्शविला.नगराध्यक्ष मुख्याधिकांऱ्यांच्या केबीनच्या कामावर त्यांनी बोट ठेवले,लोकांना चांगली सेवा देणे गरजेचे आहे,असे असताना या ठिकाणी कक्ष वातानुकूलित करून नगराध्यक्ष नेमके काय साधत आहेत.असा प्रश्न त्यांनी करून कक्षाचे दरवाजे कायम उघडे ठेवा,अशी मागणी केली.त्याला राजू बेग यांनी विरोध केला.नगराध्यक्षांनी केबिन सुसज्ज केली नाही.तर अन्य नगरसेवकांनी तशी मागणी केल्यामुळे केबिन चांगली करण्याचा निर्णय घेण्यात आला.असे त्यांनी सांगितले. तर सावंतवाडी स्वच्छ करताना आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे,असे सांगून हा मुद्दा टोलवून लावला.