सावळाराम अणावकर; सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनचा आनंद मेळावा संपन्न…
वेंगुर्ला ता.३०: सामर्थ्य आहे चळवळीचे,जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे सांघिक विचारावे हे ब्रिद सत्यतेत आणण्यासाठी सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी एकसंघ राहून पदाधिका-यांना पाठबळ दिले पाहिजे तरच आपले प्रलंबित प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी केले.सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन तालुका शाखा वेंगुर्ल्याचा आनंद मेळावा साई मंगल कार्यालय येथे तालुका अध्यक्ष सत्यवान पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी सावळाराम अणावकर, सुंदर पारकर, ना.य.सावंत, भरत आवळे, किशोर नरसुले, फटनाईक गुरुजी, घ.के.वालावलकर, विद्याधर कडुलकर, मंगेश राऊळ, ललिता अंधारी, माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर आदी उपस्थित होते.
कैवल्य पवार यांनी संघटनेचा अहवाल यांनी सादर केला. त्यात त्यांनी संघटनेने केलेल्या कामांचा व अधिका-यांना भेटी देऊन झालेल्या पूर्ततेचा आढावा घेतला. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सुशिल केळुसकर, मंजूषा पोकळे, मालिनी सातार्डेकर, प्रकाश वेंगुर्लेकर, राजाराम सावंत, महादेव तुळसकर या सभासदांचा तसेच आपल्या मुलाच्या लग्नाप्रित्यर्थ सर्व उपस्थितांना स्नेहभोजन देणा-या मंगेश राऊळ गुरुजींचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सिधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी, तालुका शाखा वेंगुर्ल्याचे शाखाधिकारी बोडेकर यांनी ‘ब‘ वर्ग सभासदांसाठी असलेल्या पतपेढीच्या बचत योजनांची माहिती दिली. गतवर्षी वेंगुर्ला शाखेने आदर्श शाखेचा मान मिळविल्याबद्दल संघटनेने बोडेकर यांचा सत्कार केला. यावेळी सन २०२० ते २०२५ सालासाठी नुतन तालुका कार्याकारिणीची बांधणी करण्यात आली.
भरत आळवे, सुंदर पारकर, ना.य.सावंत यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सत्यवान पेडणेकर यांनी, सूत्रसंचालन कैवल्य पवार यांनी तर आभार विनायक उमर्ये यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्याधर कडुलकर, विजय सावंत, संभाजी येरागी, गुरुनाथ बांदवलकर, पुरुषोत्तम मलबारी, किशोर नरसुले व सर्व कार्यकारिणी सदस्यांनी मेहनत घेतली.