चार हजाराचा समावेश; तोंडाला पाने पुसल्याचा नाटेकरांचा आरोप
बांदा.ता,३०: बांदा शहरातील २४७ पूरग्रस्त व्यापाऱ्यांना प्रत्येकी ४ हजार १०० रुपये याप्रमाणे एकूण १० लाख १२ हजार १०० रुपये शासन मदत मंजूर करण्यात आली असून लाभार्थी व्यापाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तात्काळ तलाठी कार्यालयात जमा करावीत. येत्या ८ दिवसात रक्कम खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी सांगितले. मात्र माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्येक व्यापाऱ्याला ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार असल्याचे आश्वासन देऊन व्यापाऱ्यांची चेष्टा केल्याचा आरोप व्यापारी सचिन नाटेकर यांनी केला आहे.
त्यासाठी दुकानाचा असेसमेंट दाखला, भाडे करार पावती, आधारकार्ड, बँक खाते आदी कागदपत्रे तात्काळ तलाठी कार्यालयात जमा करावीत.
*व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार- सचिन नाटेकर*
बांदा बाजारपेठ ४ दिवस पुराच्या पाण्याखाली होती. व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले. पालकमंत्री केसरकर यांनी बांदा व्यापाऱ्यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत व्यापाऱ्यांना ५० हजार भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा शासन अध्यादेश येत्या ४ दिवसात काढणार असल्याचे सांगितले होते. मात्र अशा कोणत्याही प्रकारचा अध्यादेश निघाला नसून राज्यातील सर्वच नुकसाग्रस्ताना मदत देण्यात आली आहे. मात्र आश्वासनांची खैरात करत केसरकर यांनी व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला आहे.