टोलनाका व कालवा विभागाने जबाबदारी झटकली;पोलीसांत तक्रार देण्याचा निर्णय…
बांदा ता.३०: येथील सीमा तपासणी नाका ठेकेदार कंपनीने रस्त्यालगत खोदलेल्या बोअरवेलमध्ये पडून बकरी मृत झाली. रस्त्यालगत खोदलेल्या बोअरवेल सभोवती कोणतीही संरक्षक उपाययोजना केलेली नाही. सदर बोअरवेल कालवा विभागाच्या हद्दीत असल्याने ठेकेदार कंपनीने हात झटकले आहेत. तर टोलनाका कंपनीने कालव्यालगत केलेल्या खोदाईमुळे कालव्याची सुरक्षितता तपासणीसाठी बोअरवेल खोदाई करण्यात आल्याचे कालवा विभागाचे शाखा अभियंता एस. डी. आंबिये यांनी सांगितले. दोन्ही विभागांनी आपली जबाबदारी झटकल्याने पोलीसांत तक्रार देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी सांगितले.
बांदा शाखा कालव्या लगत सीमा तपासणी नाका ठेकेदाराने खोदाई केली आहे. त्यामुळे कालव्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कालव्याची सुरक्षितता तपासणीसाठी टोलनाका कंपनीने कालव्यालगत बोअरवेल खोदली आहे. मात्र बोअरवेल सभोवती कोणतेही सुरक्षात्मक उपाय केलेले नाहीत.
बांदा पानवळ येथील शेतकरी आपल्या बोकडांना चरावयास रानात घेऊन गेले होते. सायंकाळी ४ च्या सुमारास टोलनाक्यालगतच्या बोअरवेलमध्ये बकरी पडली. लहान खड्डा असण्याच्या शक्यतेने स्थानिक प्रमोद कळंगुटकर व सहकार्यांनी जेसीबीच्या सहाय्याने बोअरवेल लगत खड्डा खोदला. त्यानंतर बांबू टाकून पाहिले असता तो बोअरवेलचा खड्डा असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिकांनी टोलनाका व कालवा विभागाला फोन करून जाब विचारला. मात्र दोन्ही विभागांनी आपली जबाबदारी झटकली.
याबाबत साईप्रसाद कल्याणकर यांनी संताप व्यक्त केला. सदर ठिकाणी लहान मुले फिरायला जातात. मनुष्यहानी झाली तर जबाबदार कोण असा सवाल केला. दोन्ही विभागांविरोधात पोलीसांत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.