संजू परब; गायन स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकार घडतील…
सावंतवाडी ता.०१: मला यशस्वी उद्योजक होण्यासाठी तत्कालीन परिस्थितीत सैनिक बँकेने मोलाचे सहकार्य केले,आयुष्यातील पहिले दुचाकीसाठी काढलेले दहा हजार रुपये कर्ज त्यांनीच मला दिले,त्यामुळे पुढे मी यशस्वी होऊ शकलो.सैनिक बँकेची प्रगती उत्तरोत्तर होत राहो,त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य मी नक्कीच करेन,असा विश्वास सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे व्यक्त केला.जिल्हास्तरीय गायन स्पर्धेच्या माध्यमातून कलाकार घडविण्याचे चांगले काम पतसंस्थेचे पदाधिकारी करीत आहेत.या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना सावंतवाडी महोत्सवात संधी देण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.येथील सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय संगीत स्पर्धेचे उद्घाटन श्री.परब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे चेअरमन शिवराम जोशी,व्हाईस चेअरमन पी.एफ.डान्टस,हींदबाळ केळुसकर,उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर,दीपाली भालेकर,राजू बेग,संचालक सुनिल राऊळ,बाबू कविटकर परीक्षक माधव गावकर,संजय धुपकर
आदी उपस्थित होते.
येथील सैनिक पतसंस्थेच्या वतीने रथसप्तमी निमित्त आयोजित जिल्हास्तरीय सुगम संगीत गायन स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीतील निवड २७ स्पर्धकांना सहभाग देण्यात आला होता.या कार्यक्रमाची सुरुवात येथील ओंकार कला मंचच्या नृत्य कलाकारांनी गणेश वंदनेने केली.
याप्रसंगी बोलताना श्री.डॉन्टस म्हणाले,बदलत्या युगात सुगम संगीत गायन पद्धतीकडे युवाईचा दुर्लक्ष होत आहे.मात्र काही युवकांचा ओढा आजही शास्त्रीय गायनाकडे आहे.अशा युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी सैनिक पतसंस्थेच्या माध्यमातून माझी सैनिकांकडून हे छोटेखानी प्रयत्न आहेत,असे मत व्यक्त केले.यावेळी दोन दिवस होणाऱ्या सुगम संगीत व नाट्यसंगीत स्पर्धेचा स्पर्धकांनी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.