बंदर विभागाकडून स्कुबा व्यवसायिकां विरोधात कारवाई…

2

आठ सिलिंडर जप्त ; कारवाईच्या विरोधात व्यावसायिकांची बंदर विभागावर धडक…

 

मालवण, ता. १ : समुद्रात स्कुबा डायव्हिंग व प्रवासी वाहतुकीचा परवाना नसल्याने बंदर विभागाने आज येथील किनारपट्टीवर धडक कारवाई करत आठ व्यावसायिकांचे सिलिंडर जप्त करण्याची कारवाई केली.
कोणताही पंचनामा न करता दडपशाही पद्धतीने कारवाई केल्याने संतप्त व्यावसायिकांनी बंदर कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर व श्री. महाडिक यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्या आदेशाने कारवाई केल्याचे सांगितले.
प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी ३१ जानेवारीला तातडीची बैठक घेत अनधिकृत स्कुबा डायव्हिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहाय्यक बंदर अधिकारी यु. आर. महाडिक, शिपाई श्री.गावकर, श्री. कदम यांच्या पथकाने आज येथील समुद्रात किल्ले सिंधुदुर्ग जवळ स्कुबा पॉईंट येथे ही कारवाई केली. यात स्कुबा व प्रवासी वाहतूक परवानगी नाही, नौका नोंदणी प्रमाणपत्र नाही, सर्व्हे नाही, नौका चालक प्रमाणित नाही  या कारणांमुळे बंदर विभागाने कारवाई करत आठ सिलिंडर जप्त केले. यात निखिल ढोके, अजित आचरेकर, अन्वय प्रभू, दामोदर तोडणकर, हेमंत रामाडे, जयदेव लोणे, बिल्लू आडकर, गौरव प्रभू यांचा समावेश होता.
बंदर विभाग मनमानी पद्धतीने व अधिकारी वर्गाचे खिसे भरण्यासाठी कारवाई करत आहे. यापूर्वी अशा घटना घडल्या असून आपल्याकडे त्याचे व्हिडीओ आहेत. तरी केलेली कारवाई अन्यायकारक, नियमबाह्य पद्धतीने व कोणताही पंचनामा न करता, कायद्यात नसताना सुरू असलेली सिलेंडर जप्ती कारवाई थांबवावी. आम्ही परवानगी मागत असताना परवानगी मिळत नाही. पर्यटन वाढीस पाठबळ न देता केवळ कारवाई हाच बंदर विभागाचा एककलमी कार्यक्रम आहे. या विरोधात प्रसंगी समुद्रात आंदोलन करणार असल्याचा इशारा दामोदर तोडणकर, गौरव प्रभू, अमित आडवलकर व अन्य व्यावसायिकांनी यावेळी दिला.
सिलिंडर जप्ती बाबत कायद्यात स्पष्ट स्वरुपात तरतुद नसली तरी प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही कारवाई केली आहे. त्यांना अधिकार आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर तुम्ही तुमची भूमिका मांडावी असे बंदर निरीक्षक ताम्हणकर व महाडिक यांनी सांगितले. संस्था नोंदणी करून स्कुबा डायव्हिंग परवानगी मिळण्यासाठी नव्या कायद्यात तरतूद असल्याचे स्पष्ट केले. यावेळी संस्था वगळता व्यक्तिगत कागदपत्रे पूर्तता वेळोवेळी केल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

4

4