जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम..

2

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या नेचर क्लबचा पुढाकार ; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…

मालवण, ता. ३ : जागतिक पाणथळ भूमी दिनाच्या निमित्ताने येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने नेचर क्लब मार्फत शहरातील सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत प्रा. हसन खान यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी, पर्यावरण प्रेमी नागरिकांनी सागरी महामार्गाच्या दुतर्फा पाणथळ जागांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा गोळा केला. यामध्ये पालिकेच्या पाच घंटा गाड्या भरून कचरा तसेच मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.
मालवण देऊळवाडा सागरी महामार्ग येथून काल सकाळी साडे सात वाजता या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. यावेळी स्वच्छतेबाबत मालवणी घोषवाक्य असलेले फलक लावण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, प्रा. आर. एन. काटकर, प्रा. हसन खान, प्रा. एम. आर. खोत, चंद्रवदन कुडाळकर, रविकिरण तोरसकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, स्वाती पारकर, डॉ. झांटये, मालवण वन अधिकारी, स्पेन येथून आलेले पर्यटक पाबलो विदाल, महाविद्यालयाचे विद्यार्थी- विद्यार्थिनी, युरेका क्लबची मुले, मालवणमधील पर्यावरण प्रेमी नागरिक आदी बहुसंख्येने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
सकाळी सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम दुपारी एक वाजेपर्यंत राबविण्यात आली. यावेळी सागरी महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणावर कचरा असल्याचे दिसून आले. यात प्लास्टिक व दारूच्या बाटल्यांचे प्रमाण मोठे होते. तब्बल पाच घंटा गाड्या भरून कचरा व एक टाटा ऐस गाडी भरून दारूच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. गोळा केलेल्या प्लास्टिक बाटल्या व काचेच्या बाटल्या स्थानिक भंगारवाल्यास देण्यात आल्या. या मोहिमेसाठी वन विभागातर्फे टोप्या, मास्क व ग्लोव्हज पुरविण्यात आले होते. तर कचरा विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील राज मालोडकर याने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून व महाराजांच्या विचारांचा फलक लावून या स्वच्छता मोहिमेची सांगता झाली.
या स्वच्छता मोहिमेवेळी सागरी महामार्गच्या संपूर्ण परिसरात कुठेच कचरा कुंड्या नव्हत्या. येथील कांदळवनांची तोड केलेली आहे. कांदळवन प्रदेशात कचऱ्याचे साम्राज्य दिसून आले तसेच मोठ्या प्रमाणावर दारूच्या बाटल्या व बांधकाम साहित्य याठिकाणी टाकले असल्याचे निदर्शनास आल्याचे प्रा. हसन खान यांनी सांगत नाराजी व्यक्त केली.

6

4