पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या ठेकेदार कंपनीला सुचना
बांदा
सुसाट व बेदरकार मायनिंग डंपर वाहतुकीच्या आचारसंहिते बाबत पोलीस, मायनिंग ठेकेदार व सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांच्यात बांदा पोलीस स्थानकात बैठक झाली. मायनिंग डंपर वाहतुकीची आचारसंहिता तंतोतंत पाळण्याचे आदेश पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी ठेकेदार कंपनीला दिले. नियमांचे पालन न केल्यास पोलीसांत फिर्याद दाखल केली जाईल असा इशारा साईप्रसाद कल्याणकर यांनी यावेळी दिला.
सुसाट व बेदरकार डंपर वाहतुक ही मोठी समस्या बनून राहिली आहे. डंपरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतुकीची आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. मात्र त्याचे पालन होताना दिसत नाही. डंपरांमधील अंतर, वेग यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते. याविरोधात साईप्रसाद कल्याणकर यांनी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी साईप्रसाद कल्याणकर, मायनिंग कंपनीचे शेखर गावकर, श्री. प्रदिप आदी उपस्थित होते. यावेळी पानवळ, गडगेवाडी येथे सुरक्षारक्षक नेमण्याचे निश्चित करण्यात आले. आचारसंहिता पालन न झाल्यास पोलीस तक्रार करण्याचा इशारा कल्याणकर यांनी दिला. आचारसंहिता पालन करण्याचे आश्वासन गावकर यांनी दिले.