वैभववाडीत मिसळ महोत्सवाची जय्यत तयारी…

2

वैभववाडी.ता,०४: भाजप आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी वैभववाडीत मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच हा महोत्सव होत असल्याने या महोत्सवाची उत्सुकता तमाम जिल्हावासीय व पर्यटकांना लागली आहे. वैभववाडी नगरपंचायत व भाजपा यांच्या वतीने या महोत्सवाची जय्यत तयारी व नियोजन सुरू आहे. या महोत्सवात मुंबई, ठाणे, पुणे व कोल्हापूर या जिल्ह्यातील नामवंत मिसळ व्यवसायिक येणार असल्याने त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही. तसेच पर्यटक व खवय्यांची गैरसोय होणार नाही. असे नियोजन करण्यात येत आहे. अशी माहिती भाजपा वैभववाडी तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी दिली.
मिसळ महोत्सव नियोजन बैठक येथील नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, महिला अध्यक्ष भारती रावराणे, बाळा हरयाण, शोभा लसणे, रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संजय सावंत, संपदा राणे, शुभांगी पवार, रत्नाकर कदम, प्रदिप नारकर, दीपक गजोबार, रवींद्र तांबे, शिवाजी राणे, संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते.
हा महोत्सव दत्तमंदिर नजीकच्या दुर्गामाता उत्सव पटांगणावर होत आहे. या मैदानात नियोजनबद्ध ३५ स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. मैदानाच्या मध्यभागी खुली जागा राहणार आहे. महोत्सवात मुबलक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. महोत्सव पासून काही अंतरावर वैभववाडी-नावळे मार्गावर चारचाकी वाहने पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व गावा-गावात या महोत्सवाची माहिती पोहोचावी याबाबत नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती नासीर काझी यांनी दिली.

6

4