आठवडाभरातील दुसरी घटना;ग्रामस्थांकडुन योग्य उपाययोजनांची मागणी….
बांदा.ता,०४:
डेगवे-मोयझरवाडी येथे शिवाजी देसाई यांच्या काजू बागेत आज मृत माकड सापडले. गेल्या ८ दिवसातील ही डेगवे गावतील दुसरी घटना आहे. काजू हंगाम सुरू होत असतानाच मृत माकड सापडल्याने गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
डेगवे गावात आतापर्यंत माकडतापाने तीन बळी घेतले आहेत. तसेच ४० हून अधिक माकडताप पॉझिटीव्ह रुग्ण सापडले होते. गेल्या दोन-तीन वर्षात डेगवे व परिसरात शेकडो माकडे मृत पावली आहेत. त्यामुळे डेगवे गावात माकडतापाची प्रचंड दहशत आहे.
शिवाजी देसाई आज सायंकाळी मिरेखण शाळेनजीकच्या आपल्या काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना बागेत उग्र वास आला. त्यांनी बागेची पाहणी केली असता मृत माकड निदर्शनास आले. याबाबतची माहिती त्यांनी उपसरपंच प्रवीण देसाई यांना दिली. त्यानंतर शिवाजी देसाई यांनी शशिकांत देसाई यांच्या मदतीने मृत माकडास दहन केले.