हरकुळ बुद्रुक येथील वसतिगृहाचा,अंदाधुंद कारभार उघड…

2

सभापतींच्या भेटीदरम्यान “पोलखोल”;चाळीस लाखाचा निधी जिरतोय कुठे?…

कणकवली, ता.०४: शहराच्या वेशीवर असलेल्या हरकुळ बुद्रूक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतीगृहात अंधांधुंद कारभार सुरू आहे. वसतीगृहातील मुले कुठे आहेत याची माहिती वसतीगृह अधीक्षकांना नाही. पोषण आहारातील तांदूळ आणि गव्हाला कीड लागलीय. झोपण्यासाठी चांगले पलंग नाहीत. तर शौचालय देखील बंद आहे. याबाबत वसतीगृह अधीक्षकांना विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून बेजबाबदारपणे उत्तरे दिली जातात. या वसतीगृहासाठी दरवर्षी 40 लाख रूपयांचा निधी येतो. एवढा निधी येऊनही वसतीगृहाची अशी दैन्यावस्था असेल तर एवढा निधी जातो कुठे असा प्रश्‍न पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी आज उपस्थित केला.
येथील पंचायत समितीमध्ये सभापती दिलीप तळेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शासकीय वसतीगृहातील गैरसुविधांची माहिती दिली. यावेळी गटविकास अधिकारी मनोज भोसले, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.
श्री.तळेकर म्हणाले, मागासवर्गीय व इतर मुलांसाठी असलेले वसतीगृह पूर्वी कलमठ येथे होते. मात्र कोणतीही जाहिरात न काढता वसतीगृह अधीक्षक संतोष जाधव यांनी हे वसतीगृह शहरापासून सहा किलोमिटर अंतरावरील हरकुळ बुद्रूक येथे नेले. या वसतीगृह 47 मुलांचे आहे. हजेरी पटावर 34 मुले दाखवली आहेत. प्रत्यक्षात 17 मुलेच आढळून आली. उर्वरित मुले कुठे आहेत, याची कोणतीही माहिती वसतीगृह अधीक्षकांना नाही. ही मुले घरी किंवा आपल्या गावी गेली असतील असे उत्तर अधीक्षकांकडून देण्यात आले.
वसतीगृहातील या मुलांसाठी असलेल्या पोषण आहारातील तांदूळ आणि गव्हाला कीड लागली आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू वापरला जातोय. मुलांना झोपण्यासाठी चांगले पलंग नाहीत. बेडशीट आणि उशा फाटक्या आणि मळलेल्या आहेत. वरच्या मजल्यावरील शौचालय बंद आहे. तर तळमजल्यावरील शौचालयाची दूरवस्था आहे. प्रथमोचार सुविधा, अग्निशमन यंत्रणा कालबाह्य आहे. महत्वाची बाब म्हणजे वसतिगृहाचा भाडेकरार झालेला नाही. वसतीगृहात कार्यालय अधीक्षक राहत नाहीत. येथे 6 कर्मचारी कामाला आहेत. यातील एकमेव वसतीगृह अधीक्षक हेच हजर होते. उर्वरित 4 कर्मचार्‍यांनी हजेरी पत्रकावर सह्या केल्या. मात्र ते दिवसभर वसतीगृहात नव्हते अशीही माहिती उघड झाल्याचे सभापती श्री.तळेकर म्हणाले. वसतीगृहाच्या या अंदाधुंद कारभाराची तक्रार ओरोस येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.

2

4