हडी कालावल येथील घटना…
मालवण, ता. ५ : कालावल खाडीपात्रामध्ये बेकायदेशीररित्या वाळू चोरी करून काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातून मालवण न्यायालयाने संशयित आरोपी जगदीश यशवंत शेडगे, सागर मोहन पोयरेकर, राहुल घन:श्याम भिसळे, प्रवीण जगन्नाथ खोत (सर्व रा. हडी व मसुरे) यांची साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती आणि बचाव पक्षातर्फे केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अॅड. स्वरूप पई यांनी काम पाहिले.
याप्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी मिलींद पारकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात १२ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०.४५ ते १२.३० या वेळेत कालीका मंदिर जेटीचे खाडीपात्रालगत संशयीत जगदीश शेडगे याच्या मालकीचे चंद्रभागा होडी, सागर पोयरेकर याच्या मालकीची वाघेश्वर कृपा होडी, राहुल भिसळे याच्या मालकीची धनलक्ष्मी होडी आणि प्रवीण खोत हे बेकायदेशीर वाळू उपसा करून वाळू चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना सापडल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासीक अंमलदार एस. टी. पवार यांनी केला होता. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे तीन साक्षीदार तपासण्यात आले होते.