बांदा गोगटे-वाळके कॉलेजमध्ये ‘शाश्वत शेती’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळा…

2

बांदा ता.०६: शिक्षण प्रसारक मंडळ, बांदा संचलित येथील गोगटे-वाळके कॉलेजमध्ये पाडगांवकर रिसर्च सेंटर यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘शाश्वत शेती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार दिनांक ८ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे.

संस्था व महाविद्यालय यावर्षी आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यामध्ये शैक्षणिक, सहशैक्षणिक, सांस्कृतिक व समाजभिमुख उपक्रमांनी हे वर्ष साजरे करीत आहे. त्यातील एक उपक्रम म्हणून महाविद्यालयातील पाडगांवकर रिसर्च सेंटरच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतक-यांच्यासाठी ही मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे. शेतक-यांना आपल्या जमिनीची पत समजल्यावर योग्य ते पीक घेता येते, अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने करता येते. यासाठी प्रथम आपल्या जमिनीचा पोत समजून घेण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. माती ही मातीमोल नसून ती जगाला पोसणारी आई आहे. या मातीचे आरोग्य कसे जोपासले पाहिजेत? याबाबतची सविस्तर मांडणी तज्ञ्ज्ञ मंडळी करणार आहेत. या माती परीक्षणाबरोबर पाणी परीक्षण या विषयावरसुद्धा तज्ञ्ज्ञ आपले विचार व्यक्त करणार आहेत.
सिंचनाकरिता पाण्याचा वापर कसा करावा पिकांना पाणी पुरवठा कशापद्धतीने करावा यासंदर्भात सविस्तर मांडणी व सुसंवाद घडणार आहे, तसेच पाने व देठ यावरसुध्दा सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या कार्यशाळेत स्वामी लॅब सोल्युशन्स, कणकवलीचे चेतन प्रभु माती, पाणी व पाने परीक्षण या विषयावर प्रात्यक्षिकासह मांडणी करणार आहेत. तर कृषी तंत्र विद्यालय वळीवंडे-देवगड येथील प्रा. विनायक ठाकूर हे ‘सेंद्रिय शेती व्यवस्थापन’ या विषयवावर मांडणी करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतीकडे आधुनिकतेने पाहत आहे. नारळ, काजू, आंबा सुपारी, केळी आदी बागायती पिकांचे व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात या एकदिवसीय कार्यशाळेत सविस्तर सुसंवाद व चर्चासत्रात मांडणी केली जाणार आहे. शेतक-यांच्या सूचना, प्रश्नांचे निरसन यावेळी करण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य शेतक-यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन डी. बी. वारंग व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत सावंत यांनी केले आहे.

4

4