ग्रामपंचायत डेटा ऑपरेटरांच्या वेतनासाठी आगाऊ अनुदान देऊन,पगार का होत नाहीत…?

2

सभापती रवींद्र जठारांचा प्रशासनाला सवाल; पगार नियमित होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश..

सिंधुदुर्गनगरी.ता,०६: 
ग्रामपंचायतींमधील कार्यरत असलेल्या डेटा ऑपरेटर चा पगार नियमित होत नाही. मग संबंधीत ग्रामपंचायतीन कडून एक वर्षे आगाऊ त्यांच्या वेतनासाठी देण्यात आलेले अनुदान गेले कुठे? हे अनुदान वर्षभर वापरूनही पगार देण्यास उशीर का? असा संतप्त सवाल सभापती रवींद्र जठार यांनी केला. तर डाटा ऑपरेटर चा पगार नियमित व्हावा यासाठी ग्रामपंचायत विभागाने पाठपुरावा करावा असे आदेश दिले.
जिल्हा परिषद वित्त समितीची मासिक सभा सभापती रवींद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी वित्त व लेखा अधिकारी तथा समिती सचिव गौतम जगदाळे, सदस्य नागेंद्र परब, जेरोन फर्नांडिस, संतोष साठविलकर, महेंद्र चव्हाण खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या वतीने नवनिर्वाचित सभापती रवींद्र जठार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सभापतींनी सभेस उपस्थित अधिकारी खातेप्रमुख यांची हजेरी घेतली. यावेळी सभेस अनुपस्थित असलेल्या प्राथमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग, समाज कल्याण विभाग, आरोग्य विभाग अधिकाऱ्यांच्या बाबत सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली. तर सभेला सुरुवात झाल्यानंतर खातेप्रमुखांना बोलावून आणावे लागत असल्याबाबत खंत व्यक्त करण्यात आली यापुढे असे चालणार नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

3

4